इचलकरंजी/प्रतिनिधी –
अल्पसंख्यांक समाजाचा विकास आणि उन्नतीसाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. परंतु निधी अभावी या योजना पूर्ण क्षमतेने अंमलात येत नाहीत. त्यामुळे अल्पसंख्यांक विभागाकडून आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस समीर जमादार व तालुका युवक काँग्रेस माजी सरचिटणीस ताजुद्दीन खतीब यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजूबाबा आवळे यांना दिले आहे.
निवेदनात, राज्य शासनाच्यावतीने अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असल्या तरी निधीअभावी त्या पूर्ण क्षमतेने अंमलात येत नाहीत. त्यामुळे मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वार्षिक बजेटमध्ये 2 हजार कोटीची तरतूद करावी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या धर्तीवर मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत व्याज सबसिडी योजना राज्यातील शेड्युल्ड व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत सुरू करण्यात यावी, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मुदतकर्ज व सुक्ष्म कर्ज योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यात याव्यात, शैक्षणिक कर्ज योजनेची कमाल कर्ज मर्यादा 15 लाख रूपये करण्यात यावी, अल्पसंख्यांक समाजातील नवउद्योजकांना विशेष प्रोत्साहनासाठी राज्यातील एमआयडीसी व इंडस्ट्रियल इस्टेट येथे 10 टक्के भूखंड राखीव ठेवण्यात यावेत, कर्नाटक वक्फ मंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मस्जिद मधील इमाम (धर्मगुरु) व मुअज्जन (बांगी) यांना मानधन सुरू करण्यात यावे आदी मागण्या नमुद करण्यात आल्या आहेत. त्याची पूर्तता होण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात पालकमंत्री नामदार सतेज पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजूबाबा आवळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ राज्याचे अल्पसंख्यांक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना पत्राद्वारे या मागण्या कळवून त्याची पूर्तता होण्याबाबत विनंती केली आहे. यावेळी नासिर गवंडी, आलम मोमीन व अस्लम खलिफा आदी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर महाराष्ट्र