पुणे : ६० वर्षांपासून रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रसिद्ध गायिका कीर्ती शिलेदार यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनय आणि गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ६० वर्षे त्यांनी अव्याहतपणे रंगभूमीची सेवा केली. जयराम आणि जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या. २०१८ मध्ये झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताची आराधना केली. शास्त्रीय संगीताच्या उच्च शिक्षणाचे धडे त्यांनी निलखंठबुवा अभ्यंकर यांच्याकडून घेतले. परदेशातही अनेक शास्त्रीय संगीताच्या मैफिली त्यांनी गाजवल्या होत्या. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अतिशय गाजलेले नाटक आहे.