मुंबई: पुणे जिल्ह्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता किमान पुढचा एक आठवडा शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय काल झालेल्या कोरोनाविषयक बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या शाळा आता सुरू होणार असल्या तरी स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून त्याबद्दलचा निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. रुग्णसंख्या कमी होईपर्यंत कोरोनाविषयीची यापूर्वीचीच नियमावली कायम ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही पुढच्या आदेशापर्यंत शाळा बंद राहणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे बंद करण्यात आलेल्या शाळा उद्या पासून सुरू होत आहेत. त्यानुसार धुळे जिल्हा शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४२० शाळा सुरू होणार आहेत.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग २८ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष अध्ययनाऐवजी ऑनलाईन पद्धतीनंच सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी काल दिले. जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती पाहून २८ जानेवारी रोजी याबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.
सोलापूर शहरात कोरोनाच्या चाचण्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय एक आठवडा लांबणीवर टाकण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग २४ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचं संमतीपत्र गरजेचं आहे. ते सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहील अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यवतमाळमध्ये जानेवारीच्या २८ तारखेपासून ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. तर प्राथमिक शाळांबाबतचा निर्णय कोरोनाची परिस्थिती पाहून २८ जानेवारी रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Posted inमहाराष्ट्र मुंबई शैक्षणिक