इचलकरंजी/प्रतिनिधी –
वीज बिल सवलत थांबविण्याचा झालेला निर्णय हा निश्चितपणे चुकीचा आहे. तो थांबविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. तोपर्यंत 27 एचपीवरील यंत्रमागधारकांनी आपली जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील वीज बिले जुन्या दराने भरावीत, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले आहे. यासाठी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
27 एचपीवरील ज्या यंत्रमागधारकांनी वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी केली नाही त्या सर्वांची वीज सवलत बंद करण्याचे आदेश वस्त्रोद्योग आयुक्त नागपूर यांनी दिले आहेत. त्यामुळे चालू महिन्यात या यंत्रमागधारकांना वाढीव दराने वीज बिले आली असून शासन निर्णयाविरुध्द संताप व्यक्त करत 27 एचपीवरील यंत्रमागधारकांनी वीज बिले न भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात सोमवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी व उपकार्यकारी अभियंता सुनिल अकिवाटे यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे महावितरण कंपनीचे सीई श्री. भागवत यांच्याशी चर्चा करुन त्यांना जुन्या दराने वीज बिल भरुन घेण्याबाबत आवाहन केले.
आमदार आवाडे म्हणाले, देशातील यंत्रमाग व्यवसायातून होणार्या उत्पादनापैकी 54 टक्के हे केवळ महाराष्ट्रात होते. या उद्योगाला मदत म्हणून शासनाकडून सर्वच यंत्रमागधारकांना वीज सवलत दिली जात होती. परंतु मागील महिन्यात शासनाने 27 एचपीवरील वीज सवलत बंद केली आहे. इचलकरंजी शहरात साधे व ऑटोलूम मिळून 16 हजार ग्राहक आहेत. त्यामध्ये 27 एचपीवरील 2500 पेक्षा अधिक ग्राहक आहेत. त्यापैकी केवळ 239 जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत. वीज सवलत बंद केल्यामुळे चालू महिन्यात दुप्पट दराने वीज बिले आहेत. इचलकरंजीतून सर्व मिळून जवळपास 65 कोटी रुपये वीज बिल जमा होता. त्यामध्ये 27 एचपीवरील 22 कोटी रुपयांचा समावेश आहे. आता ते 45 कोटी रुपये झाल्याने जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला यंत्रमागधारक हवालदिल झाला आहे. त्यामुळे 27 वरील यंत्रमागधारकांनी वीज बिले न भरण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय मला मान्य नसल्याचे मी सांगत आलो आहे. त्यामुळे महावितरण ने जुन्या दराने वीज बिले भरुन घ्यावीत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. या संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे सीई भागवत यांच्याशी चर्चा केली. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील बिले ही जुन्या दराने भरुन घ्यावीत, अशी विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. भागवत यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांनी जुन्या दराने वीज बिले भरावीत, जेणेकरुन उद्योग सुरु राहिल. या संदर्भात उद्या (मंगळवारी) राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर प्रश्न मांडणार आहे. सबसिडी संदर्भात कॅबिनेटने घेतलेला निर्णय रद्द करता येत नाही. त्यामुळे वीज सवलत निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु. यामध्ये कोणीही राजकारण न आणता जुन्या दराने वीज बिले भरुन सहकार्य करावे. लवकरात लवकर वीज सवलतीच्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावून जून्या दरानुसारच बिले येतील यासाठी आपण प्रयत्नशील असून 75 पैशांची अतिरिक्त सवलत निश्चितपणे मिळवून देऊ असे आमदार आवाडे यांनी सांगितले.
Posted inकोल्हापूर