कोरोनाचा विळखा सैल! मुंबईत आज १ हजार ८१५ नवे बाधित; २२ हजार सक्रिय रुग्ण

मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईतील रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. गेल्या 24 तासांत मुंबई 1 हजार 815 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत काही प्रमाणात रुग्णसंख्या आणखी कमी झाल्याने मुंबईकरांची चिंता काहीशी कमी झाली आहे. दरम्यान राज्यात मात्र कोरोना रुग्ण अजूनही आढळत असल्याने मुंबईकरांना अजूनही काळजी घेऊन नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मुंबईत सद्यस्थितीला 22 हजार 184 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मंगळवारी 1 हजार 815 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 556 झाली आहे. तर मागील 24 तासांत 753 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे.