आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने संकल्प करावा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने संकल्प करावा असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील मुख्य शासकीय कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
कोरोना काळात सर्व पातळीवरील सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. कोविडचा (Covid -19) नियोजनबद्धरित्या मुकाबला केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या ‘मुंबई मॉडेल’ चेही त्यांनी कौतूक केले आहे. मुंबई उच्च न्यायालय, नीती आयोग तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. हे सर्व यश केवळ प्रशासनाचे नसून फ्रंट लाईन वर्कर्स, डॉक्टर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे आहे आणि म्हणून या करोना योद्ध्यांचे मी मनापासून कौतुक करतो असे ते म्हणाले. मात्र कोरोनाचे सावट अजूनही गेलेले नसल्याने तात्काळ कुणीही बेसावध होऊ नये, आरोग्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे त्याचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणातही सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामीण भागासह आता शहरांनीही स्वच्छता चळवळीला आपलेसे केले आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसीत महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन काम करत आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना सर्वांनी एकत्र येऊन एका नवा, बलशाली महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.