चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का?; राऊतांमुळे सोमय्यांच्या टार्गेवर असलेल्या चहावाल्याचं ‘टीव्ही9’ला रोखठोक उत्तर

मुंबई: पुण्यातील कोव्हिड सेंटरचं (covid center) कंत्राट एका चहावाल्याला महाविकास आघाडीने दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. राजीव साळुंखे नावाच्या चहावाल्यावर सोमय्या यांनी हे आरोप केले होते. त्यानंतर हा चहावाला अचानक चर्चेत आला. सोमय्या केवळ आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी परळ येथील या चहावाल्याच्या हॉटेलात जाऊनही पाहणी केली. त्यानंतर टीव्ही9 मराठीच्या टीमने सर्वात आधी या चहावाल्याला शोधून काढले. राजीव साळुंखे (rajiv salunkhe) यांनी सर्वात आधी ‘टीव्ही 9 मराठी’ला फोनो दिला. त्यात त्यांनी सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. या देशाचा पंतप्रधान एक चहावाला होऊ शकतो. मी तर बिझनेस मन आहे. मी कोव्हिड सेंटर का चालवू शकत नाही? असा रोखठोक सवाल राजीव साळुंखे यांनी सोमय्यांना केला आहे.

काल मी किरीट सोमय्यांची बाईट पाहिली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे देणार आहे. सध्या मी वकिलासोबत बसलो आहे. सर्व उत्तरे देईन. जे आहे ते आहे. आम्ही काही चोरी केली नाही. रितसर सरकारच्या नियमानुसार आम्ही टेंडर मिळवलं आहे. त्यांना कुठून खोटी माहिती मिळाली माहीत नाही, असं राजीव साळुंखे म्हणाले.

सोमय्यांच्या जन्माआधीपासून आमचं हॉटेल

सोमय्या सारखं चहावाला चहावाला असं म्हणत आहेत. माझ्या हॉटेलला जवळजवळ 70 वर्ष झाले आहेत. तेव्हा सोमय्यांचा जन्मही झाला नसेल. सोमय्या माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. मी सर्व डिटेल्स देईल. निश्चितपणे देणार आहे. मी मुंबईतच आहे. पण वकिलासोबत आहे. खोटेनाटे आरोप सुरू आहेत. आम्हालाही उत्तर द्यावे लागणार आहे. त्या संदर्भानच मी वकिलांना भेटलो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे पॉलिटकल इश्यू

आमच्या न्यू लाईफ कंपनीत डॉक्टरही आहेत, त्यामुळे चहावाल्याला कंत्राट मिळालं असं कसं म्हणता. चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो. तर एवढी वर्ष धंदा करणारा बिझनेसमन लोकांची सेवा करण्यासाठी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का? माझ्या स्वत:च्या घरातील पाच जण कोव्हिडने गेले. यापेक्षा वेगळं दु:ख काय सांगू? हे पॉलिटिकल इश्यू आहेत. ते उगाच आम्हाला हायलाईट करत असून त्रास देत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *