ऐतिहासिक भेटीचा क्षण शब्दात मांडता न येणारा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ, आंबडवे येथील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना….
मंडणगड : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब आमच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावी प्रत्यक्ष येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेतले हा सोहळा अत्यंत स्फूर्तीदायी आणि आनंददायी असून आम्ही आंबाडवेवासिय राष्ट्रपतींचे मनापासून आभार व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो. डॉ बाबासाहेबांनी संविधानाद्वारे या देशाला सर्वात मोठी लोकशाही दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तत्वप्रणालीवर आपला देश प्रगतीपथावर जात आहे. देशाच्या जडणघडणीत व वाटचालीत डॉ.बाबासाहेबांचे योगदान अनन्यसाधारण आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला राष्ट्रपतींनी भेट देणे ही आजपर्यंत पहिलीच आणि अत्यंत क्रांतिकारी – ऐतिहासिक बाब म्हणून आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही, अशी स्फूर्तीदायी भावना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ,आंबडवे येथील पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. स्मारकाला भेट देऊन राष्ट्रपती महोदयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेऊन राष्ट्रपती व राज्यपाल यांनी जिल्ह्याला केलेले मार्गदर्शन मोलाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे स्मारकाच्या भेटीप्रसंगी उपस्थित राहिलेले देशाचे राष्ट्रपती मान.रामनाथ कोविंद तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, जिल्हा पोलीस अधीक्षक व मान्यवर उपस्थितीची आंबडवे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील अत्यंत महत्त्वपूर्ण क्षणचित्रे टिपलेली असून मा.राष्ट्रपतींच्या ऐतिहासिक भेटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. याचा प्रत्यय आज मंडणगडसह जिल्ह्याला आला.