रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या 9 पंचायत समितींची मुदत 13 मार्च रोजी संपली आहे. यानंतर 14 मार्चपासून या पंचायत समितींवर प्रशासक लागू झाला आहे. संबंधित गटविकास अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सभापतींची वाहनेही जमा करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदांचा कार्यकाल 20 मार्चला समाप्त होत असल्याने 21 मार्चपासून जिल्हा परिषद प्रशासकांच्या हाती जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेशदेखील ग्रामविकास विभागाने काढले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका विहित कालमर्यादेत घेणे शक्य नाही, असे स्पष्ट करून राज्य शासनाला जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत कळवले होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये 21 मार्चपासून संपूर्ण कारभार प्रशासनाकडून पाहिला जाणार आहे. निवडणुका घेण्याचा अधिकार राज्य सरकारने घेतल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंदाजे सहा महिने पुढे जाणार आहेत.
Posted inरत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 21 पासून प्रशासक

Last updated on March 16, 2022