मुंबई : महविकास आघाडीतील नेते आयकर विभागाच्या रडारवर असून आता परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आयकर विभागानं परब यांच्याशी संबंधित २६ ठिकाणी आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीत आयकर विभागानं छापे टाकले असून दापोली येथील जमीन व्यवहार प्रकरणात आयकर विभागाकडून कारवाई सुरू आहे.
अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्यावरही आयकर विभागाची नजर आहे. तसेच परब यांच्या जवळच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या घरीही छापे पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दापोलीतील जमीन खरेदी प्रकरण आणि रिसॉर्टची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
दापोलीमध्ये २०१७ मध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाला. एका व्यक्तीनं १ कोटी रुपये मोजून जमीन खरेदी केली. दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१९ मध्ये जमिनीची नोंदणी करण्यात आली. २०२० मध्ये ही जमीन दुसऱ्या व्यक्तीनं खरेदी केली. या व्यक्तीचं नाव सदानंद कदम आहे. कदम हे परब यांचे निकटवर्तीय असून ते व्यवसायानं केबल ऑपरेटर आहेत.
२०२० मध्ये सदानंद कदम यांनी १ कोटी १० लाखाला जमीन खरेदी केली. त्यानंतर तिथे रिसॉर्ट बांधण्यात आलं. त्यासाठी ६ कोटी रुपयांचा खर्च आला. ही सगळी रक्कम रोख स्वरुपात खर्च करण्यात आली. रिसॉर्ट बांधताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. या व्यवहारात मूल्यांकन कमी दाखवून कमी स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. त्यामुळे सरकारी तिजोरीत कमी महसूल झाला. सरकारची फसवणूक करण्यात आली, असा आयकर विभागाचा आरोप आहे.
‘तो’ सरकारी अधिकारी कोण?
दापोली जमीन खरेदी प्रकरणात एक सरकारी अधिकारीही आयकर विभागाच्या रडारवर आहे. हा अधिकारी परब यांचा निकटवर्तीय असल्याचं समजतं. आयकर विभागानं त्याचं नाव सांगितलेलं नाही. मात्र त्याच्या मालकीचा एक बंगला, फार्महाऊस असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.