⭕गाव विकास समितीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा परिषद सीईओ यांची भेट,जिल्हा परिषद याबाबत निर्णय घेणार,सीईओचे आश्वासन!
⭕गाव विकास समितीने अनेक गरीब विद्यार्थ्यांचे दाखले दिले काढून,फी देखील माफ करून दिली.
रत्नागिरी : लॉकडाऊन काळात मुंबई व अन्य शहरातून अनेक विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यात आपापल्या गावच्या शाळेत दाखल झाले.आर्थिकदृष्ट्या स्थिती अडचणीची असल्याने अनेक विद्यार्थी शाळेची फी लॉकडाऊन असताना भरू शकले नाहीत.परिणामी अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मुंबई येथील शाळे मधील दाखले मिळाले नाहीत याबाबत शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे व विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनिल खंडागळे यांनी जिल्हा परिषद सीईओ यांची भेट घेऊन केली आहे.
यावेळी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी,जिल्हा संघटक मनोज घुग हे देखील उपस्थित होते. यावेळी सीईओ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद उपशिक्षण अधिकारी संदेश कडव यांच्या सोबत गाव विकास समितीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन सीईओ व शिक्षण विभागाने दिले. विद्यार्थ्यांना दाखले मिळत नसल्याबाबत तक्रारी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्याकडे काही शिक्षक व पालकांनी केल्या होत्या.गाव विकास समितीचे सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले यांच्यावर याबाबतची जबाबदारी संघटनेने दिली होती. त्यानंतर गाव विकास समिती संघटने मार्फत शिक्षक व पालक यांच्या मागणी नंतर दाखले न मिळाल्याने अडचणीत असलेल्या काही विद्यार्थ्यांना हे दाखले मुंबईतून मिळवून देण्यात आले.संबंधित विद्यार्थ्यांची फी सुद्धा गाव विकास समितीने माफ करून दिली.यानंतर संबंधित शाळांचे शिक्षक व ग्रामस्थांनी गाव विकास समितीचे आभार देखील मानले आहेत.मात्र असे दाखले न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात जास्त असण्याची शक्यता आहे. हे दाखले जिल्हा परिषद प्रशासनाने शासन स्तरावर पाठपुरावा करून मुंबईतून मागवून घ्यावेत अशी विनंती गाव विकास समिती मार्फत डॉ.मंगेश कांगणे व सुनिल खंडागळे यांनी सीईओ यांची भेट घेऊन केली आहे.