रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या भावाने भाजपच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेकवेळा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात काही कारणांनी टोलेबाजी सुरु असते. कोकणातील शिवसेना, भाजपा नेतेही एकमेकांवर निशाणा साधत असतात. तसेच रत्नागिरीच्या विकासात्मक मुद्दावर सोशल माध्यमांमातून सामान्य नागरिक स्वतःची मत मांडून रोष व्यक्त करीत असतात. यातच आता सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट प्रकरणी आपल्याला धमकी दिल्याची एन.सी. भाजप पदाधिकाऱ्याने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली आहे.
‘सोशल मिडीयावर आमच्याविरुध्द बोलणे बंद कर नाहीतर तुला मी घरात घुसून मारीन’ अशी फोनवरुन धमकी दिली असा आरोप भाजपाचे योगेश हळदवणेकर (ऱा स्वामी प्रसाद अपार्टमेंट, सन्मित्रनगर, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. ही घटना रविवारी रात्री 9.26 च्या सुमारास घडल़ी आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार योगेश हळदवणेकर हे भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस पदाची धुरा सांभाळत आहेत. तसेच ते शहरातील कामकाजाबद्दल वारंवार आपली मत शोशल माध्यमांवर मांडत असतात. शहरातील कामकाजाबद्दल मत मांडत असताना रविवारी रात्री 9.26 च्या दरम्यान हळदवणेकर यांना व्यवसायाने विकासक असलेले किरण सामंत (रा. पाली, रत्नागिरी) यांनी मोबाईलवर फोन करुन ‘तू सोशल मिडीयावर आमच्याबद्दल बोलणे बंद कर, नाहीतर तुला मी घरात घुसून मारीन, अशी धमकी दिली म्हणून तक्रारदार हळदवणेकर यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे, तसेच तक्रारदार हळदवणेकर यांना योग्य त्या कोर्टात जावून दाद मागण्याची समज ही देण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करत आहेत.