मुंबई : रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती होते हे पहावं लागणार आहे. रुपाली चाकणकर यांची काही दिवसांपूर्वीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने रुपाली चाकणकर यांनी एक व्यक्ती एक पद यानुसार राजीनामा दिला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केला. त्यानंतर या पदाची जबाबदारी रुपाली चाकणकर यांना देण्यात आली. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांना बढती मिळाली होती. त्यांनी या संधीच सोनं करत वेळोवेळी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजपकडून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात अनेक वेळा शाब्दिक युद्ध सुद्धा पाहण्यास मिळालं.