कबनूर प्रतिनिधी / चंदुलाल फकीर
कागलच्या वहिदा मकानदार यांनी बारा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर जिद्द व स्वतःवरचा विश्वासाने अभ्यासातील सातत्याच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत राज्यात २४ वी येण्याचा मान मिळवला आहे. कागल शहरातील पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मानही मिळाला आहे. सलग १२ ते १४तास अभ्यास करून त्यांनी हे यश मिळवले आहे. कागल येथील जयसिंगराव पार्क वसाहतींमधील किराणा दुकानदार असलम मकानदार यांची मुलगी वहिदा यांचे प्राथमिक शिक्षण येथील जयसिंगराव घाटगे विद्यामंदिरमध्ये तर पाचवी ते बारावीचे शिक्षण श्री शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये झाले. बारावी सायन्स नंतर २०१० साली शहाजी लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी मिळवली.त्यानंतर वकिली व्यवसाय सांभाळत मुलांचे संगोपन करत वेळोवेळी न्यायाधीश पदांच्या परीक्षा दिल्या.२०१२, २०१४ मध्ये पूर्व परीक्षेत अपयश आले.नंतर २०१६ पासून सातत्याने चार वेळा न्यायाधीश पदासाठी मुलाखत दिली होती. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर म्हणून त्यांची निवड झाली असून सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.त्यांच्या या यशासाठी पती आसिफ मकानदार, आई उल्फत, वडील असलम मकानदार,चुलते रशीद मकानदार यांची प्रेरणा लाभली.निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी व जिल्हा न्यायाधीश महेश जाधव, झेड. झेड.खान, न्यायाधीश आरिफ शेख, ॲडव्होकेट फारुख कोतवाल,ॲडव्होकेट गुंजीकर,ॲडव्होकेट गणेश शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी माध्यमाशी बोलताना म्हणाले की, कोणत्याही परीक्षेसाठी सातत्य असेल तर यश नक्की मिळते विद्यार्थ्यांनी जिद्द सोडू नये स्वतःवरचा विश्वास कायम ठेवावा कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी प्रयत्नशील राहा अपयशातून खचून न जाता मी प्रामाणिक प्रयत्न करत राहिल्यामुळे मला हे यश मिळाल्याबद्दल मला आनंद होत आहे असे त्यांनी सांगितले.