राजकारण हे केवळ सत्ताकारण बनत आहे – प्रसाद कुलकर्णी यांचे मत

राजकारण हे केवळ सत्ताकारण बनत आहे – प्रसाद कुलकर्णी यांचे मत

राजकारण हे केवळ सत्ताकारण बनत आहे

प्रसाद कुलकर्णी यांचे मत

किर्लोस्करवाडी ता.२८, समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी राजकारण करणे अपेक्षित असते.सत्तेचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असते.आपल्या सत्ताकाळात केलेल्या कामाच्या व घेतलेल्या निर्णयांची मुलमंत्राच्या आधारे मते मागण्याऐवजी निवडणूक जिंकण्याचे एक नवे तंत्र विकसित झाले आहे. त्यातून राजकारण हे केवळ सत्ताकारण बनलेले आहे. प्रचंड वाढती महागाई ,बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग व्यवसाय, रूपयाचे अवमूल्यन , सतत खालावणारा जीडीपी,वाढणारे कर्जबाजारीपण, चुकीचे ठरलेले निर्णय,फसलेले परराष्ट्रनिती या विषयांच्या चर्चेशिवाय निवडणुका लढवण्याचा व जिंकण्याचा फंडा भारतीय राजकारणामध्ये आला आहे. आर्थिक,सामाजिक प्रश्नापेक्षा धार्मिक ध्रुवीकरण प्रचारात आणून सत्तासोपान चढला जात आहे.पण महागाई,बेरोजगारी यासह विविध प्रश्नांची सोडवणूक न करता हे सारे फार काळ चालेल असे वाटत नाही. कारण शेवटी कृत्रिम भावनिकता,धार्मिकता आदीपेक्षा भाकरी केंद्रबिंदू महत्वाचा असतो,असे मत समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते ते रामानंदनगर येथे आचार्य शांताराम बापू गरुड प्रबोधन व्याख्यानमालेत ” राजकारणाची दशा व दिशा ‘ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना बोलत होते.क्रांती अग्रणी डॉ.जी.डी..बापू लाड जन्मशताब्दी ,भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यानिमित्ताने ही व्याख्यानमाला समाजवादी प्रबोधिनी शाखा पलूस तालुका,व्ही.वाय.आबा पाटील समाज प्रबोधन अकादमी आणि सर्व परिवर्तनवादी संघटना यांच्यावतीने आयोजित केली होती.अध्यक्षस्थानी डॉ.अमोल पवार होते. स्वागत आदम पठाण यांनील केले. व्ही.वाय.आबा पाटील यांनी प्रास्ताविक केले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्य आंदोलनापासून आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीपर्यंत मध्यमवर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. १९९० नंतर नव्या आर्थिक धोरणातून निर्माण झालेला मध्यमवर्ग हा समतेच्या चळवळी पासून दूर जाताना दिसत आहे. जातीय व धार्मिक समीकरणांच्या प्रभावाखाली येण्याचे त्याचे संख्यात्मक प्रमाण वाढले आहे. कोणाचीही सत्ता आली तरी काही फरक पडत नाही मग जाती -धर्मावर आधारित राजकारण करणारे पक्ष जवळचे वाटू लागतात असे चित्र आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि नियोजनबद्ध विकासाच्या मूळ प्रेरणांशी फटकून वागणारे आज आत्मनिर्भरतेच्या गप्पा करत आहे.आणि देशप्रेम- देशद्रोहीची प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रम करत आहेत.अशावेळी राजकारणाची होत असलेली दुर्दशा समजून घेऊन त्याला योग्य दिशा देण्याचे काम जनतेलाच करावे लागेल. जनता ते निश्चितपणे करेल. कारण भारतीय लोकमानसानी आपली शक्ती वेळोवेळी दाखविली आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात या विषयाची तपशीलवार व सखोल मांडणी केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.अमोल पवार म्हणाले, अमृत महोत्सवी वर्षात राजकारणाची ही दशा का झाली याबाबतचा मूलभूत पातळीवर विचार होण्याची गरज आहे. समाजापुढे चांगले काम करणारा सक्षम पर्याय जर उभा केला तर त्याचा स्वीकार केला जातो हेही दिसून येत आहे. म्हणूनच राजकारणाकडे सकारात्मकतेने व कृतिशील विकासाच्या दृष्टीने पाहण्याची व त्यातील सक्रीय सहभागाची गरज आहे. किर्लोस्करवाडीच्या कामगार भवनात झालेल्या या व्याख्यानास पलूस ,कडेपूर तालुक्यातील जिज्ञासू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी श्रीमती मोहिते यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *