संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला पकडणाऱ्या 15 पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार शौर्य दाखविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरकार वाढ करणार आहे. सरकारने 2020 मध्ये हा निर्णय घेतला होता. आता या निर्णयाची अमंलबजावणी होणार आहे. तब्बल 14 वर्षानंतर राज्य सरकारने हे पाऊल उचले आहे.
अजमल कसाबसह इतर 9 दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला केला होता. यावेळी 8 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते. दरम्यान, मुंबईतील कामा रुग्णालयाजवळ एटीस प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे आणि पोलिस निरक्षक विजय साळसकर यांच्या हत्येनंतर कसाब व त्याच्या साथीदारांनी एका स्कोडा कार हायजॅक करत ते मलबार हिलच्या दिशेने जात असताना पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर नाकाबंदी केली होती. कार थांबविण्यासाठी पोलीस पुढे आले असता कसाबने त्याच्या एके 47 रायफलने गोळीबार केला होता. यावेळी सहाय्य्क पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे आणि इतर पोलिसांनी कसाबला पकडण्यासाठी न डगमगता कसाबवर तुटून पडले होते. यावेळी तुकाराम ओंबळे शहीद झाले होते. तर पोलिस निरीक्षक संजय गोविळकर जखमी झाले होते. पोलिस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या इस्माईल या दहशतवाद्याला ठार केले आणि पोलिसांनी कसाबला जिवंत पकडले होते.
बक्षीस म्हणून मिळणार ‘वन स्टेप प्रमोशन वेतन’
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल 12 वर्षांनी म्हणजेच 2020 साली कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘वन स्टेप प्रमोशन वेतन’ देण्याचे जाहीर केले होते. वन स्टेप प्रमोशन वेतन म्हणजेच पोलीस ज्या पदावर आहेत त्यांना त्यांच्या वरील पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना जेवढा पगार आहे तेवढा पगार मिळणार. या बक्षिसास पात्र ठरलेल्या 15 जणांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. हे बक्षीस देण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले असून लवकरच या आदेशाची अमंलबजावणी होणार आहे.