कोल्हापूरमधील ओबीसींनी वंचित बहुजन आघाडीच्या
शाहीद शेख यांना मते द्यावीत!
ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक प्रा. श्रावण देवरे यांचे पत्रक
नाशिक- कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेना या सर्व प्रस्थापित पक्षांनी मिळून षडयंत्र केले व ओबीसींचे राजकीय आरक्षण नष्ट केले. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी ओबीसींच्या महाजोतीचे 125 कोटी रूपये व समाजकल्याण खात्याचे 108 कोटी रूपये बेकायदेशीरपणे काढून घेतलेत व ते मराठ्यांच्या सारथीला दिलेत. भटकेविमुक्त जमातीच्या कर्मचारी अधिकार्यांचे प्रमोशनमधील आरक्षण अजित पवारांनी काढून घेतलेत. इंपिरीकल डेटा गोळा करायला वेळेवर पैसे न देणे, भाजपच्या फडणवीसांनी केंद्रातील भाजप सरकारकडून डेटा मिळविण्यास नकार देणे आदी अनेक समस्या निर्माण करुन सर्व प्रस्थापित पक्ष ओबीसींचे वाटोळे करीत असतांना, त्या सर्व पक्षातील ओबीसी नेते मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत, ही शरमेची बाब आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर पोटनिवडणूकीत पुन्हा याच पक्षांच्या उमेदवारांना मते देऊन ओबीसींनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. त्याऐवजी फुलेशाहुआंबेडकरांच्या विचारधारेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहीद शेख यांनाओबीसी जनतेने प्रचंड मतांनी निवडून आणावे, असे आवाहन ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक प्रा. श्रावण देवरे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात इतिहासाची साक्ष देतांना पुढे म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा या उपरोक्त पक्षांचा पराभव होतो, तेव्हाच ओबीसी-बहुजनांचे भले होत असते. 1978 साली या प्रस्थापित पक्षांचा पराभव करून जनता पक्षाचे सरकार आले व त्यांनी मंडल आयोग नियुक्त केला. 1989 साली प्रस्थापित पक्षांना पराभूत करून जनता दलाचे सरकार आले. या सरकारने मंडल आयोगाची अमलबजावणी केली. इतिहासापासून बोध घेऊन या पोटनिवडणूकीत प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करवून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रंचंड मतांनी निवडून आणावे, असे आवाहन पत्रकाच्या शेवटी प्रा. देवरे यांनी केले आहे.