जवाहर साखर कारखान्यामार्फत निमशिरगांवात ऊसपिक परिसंवाद
हुपरी –
जवाहर साखर कारखान्यामार्फत ऊस उत्पादक सभासद व शेतकर्यांच्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील निमशिरगांव येथे ‘सुरू लागण आणि ऊस उत्पादकता वाढ’ या विषयावर ऊसपिक परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक जिनगोंडा पाटील होते. तर संचालक गौतम इंगळे व्ही. एस. आय. चे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे, डॉ. जे. एम. रेपाळे, उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे, सिनीयर अॅग्री ओव्हरसियर भूषण कोले, अजित चौगुले कारखान्याच्या इचलकरंजी विभागीय स्टाफ व भागातील शेतकरी आणि कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये कारखान्याच्या ऊस विभागाचे बाळासो पाटील यांनी, कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, जेष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांनी कारखान्याच्या सुरवातीपासून ऊसविकास योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली आहे. त्याचाच भाग म्हणून कमी पाण्याच्या परिसरात कारखान्याद्वारे सुरू ऊस लागवडीकरिता शिफारस केलेल्या जातीचे ऊस बियाणे, रासायनिक खते, औषधे तसेच शेतक-यांना मार्गदर्शन व प्रबोधन ऊस विकास योजनेच्या माध्यमातून दिले जात असलेचे सांगीतले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. रमेश हापसे यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जर जास्तीत जास्त शेतकर्यांनी आडसाली ऊस लागण केल्यास त्या शेतकर्यांना वेळेत ऊसाची तोड मिळणार नाही. आडसाली पिक हे 18 महिन्यांचे असलेने शेतकर्याचे अर्थचक्र या पिकातून चालत नाही. त्याचबरोबर जमिनीची प्रत खराब होवून त्या नापीक होण्याचे प्रमाण वाढत आहे. या करिता पूर्वहंगामी, सुरू व खोडवा ऊस पिकाचे उत्पादन हे शेतक-यांकरिता व जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवणेकरिता उपयुक्त आहे. ऊस लागणीकरिता जमिनीची चांगली मशागत, एकरी 25 बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत, लागणीकरिता योग्य ऊस जातीची निवड, ऊसाचे 9 ते 10 महिन्याचे सशक्त व निरोगी बियाणे, सुपर केन नर्सरीद्वारे ऊस रोपांची लागवड, वेळेवर बेसल व भरणी डोस, सुक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी, आणि ठिबकसंचाद्वारे दररोज दोन तास व आठवड्यातून एकदा पाटपाणी आवश्यकतेनुसार दिल्यास सुरू ऊस लागणीचे तसेच आडसाली, पूर्वहंगामी व खोडवा ऊस पिक उत्पादनात 20% वाढ सहज शक्य असलेचे सांगीतले. शेतामध्ये असणारे पाचट, वाळलेले तण, ऊसाचा पाला इ. प्रत्येक वस्तूत सेंद्रीय कर्ब असून त्याला आपण शेतामध्येच कुजविणे आवश्यक आहे. ताग, धैंच्या ही हिरवळीची खते तसेच कडधान्ये पिके घेवून शेतातील सेंद्रीय कर्ब वाढविणे अत्यंत आवश्यक असून याद्वारे निर्माण झालेल्या जिवाणूंच्या सहाय्यानेच आपण दिलेली रासायनिक खते ही विघटन होवून ऊस पिकास मिळून ऊस उत्पादनात निश्चित वाढ होत असेलेचे सांगितले.
Posted inकोल्हापूर
जवाहर साखर कारखान्यामार्फत निमशिरगांवात ऊसपिक परिसंवाद
