मुंबई : मुंबईकरांना उन्हाळ्यात गारेगार प्रवास करता यावा यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लाेकलच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यातच तिकीट दरात ५० टक्के कपात केली आहे. त्यामुळे कमी पैशांत वाहतूक काेंडीत न अडकता एसी लाेकलने प्रवास हाेत असल्याने एसी लाेकलला प्रवासी पसंती देत आहेत, तर दुसरीकडे ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांना पाठ फिरवत आहेत.
पहिली एसी लाेकल पश्चिम रेल्वे मार्गावर २५ डिसेंबर २०१७ पासून धावू लागली. त्यानंतर ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावर आणि मध्य रेल्वेच्यामध्य रेल्वेवर एसी लाेकल सुरू करण्यात आली. एसी लाेकलचे तिकीट दर साध्या लाेकलच्या प्रथम श्रेणीपेक्षा १.३ पट जास्त असल्याने सुरुवातीपासून मुंबईकरांनी एसी लाेकलकडे पाठ फिरविली. परंतु, गेल्या वर्षी जून महिन्यात रेल्वेने घेतलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात ९० टक्के प्रवाशांनी एसी लाेकलच्या तिकीट दरात कपात करण्याची मागणी केली.
त्यानुसार रेल्वे बाेर्डाने मेट्राेच्या धर्तीवर ५ मेपासून एसी लाेकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केली. त्यातच वाढत्या उकाड्यामुळे आणि तिकीट दर कमी झाल्याने प्रवाशांनी एसी लाेकलने प्रवास करण्यास प्राधान्य दिले.
एसी लाेकलचा प्रवास स्वस्त झाल्याने लग्नकार्य, खरेदी, महाविद्यालयीन विद्यार्थी, बँक आणि इतर खासगी कर्मचारी एसी लाेकलकडे वळू लागले आहेत. ॲप आधारितचा दर हा एसी लाेकलपेक्षा दहापट जास्त आहे. दर जास्त आणि त्यातच शहरातील वाहतूक काेंडीची समस्या यामुळे मुंबईकर आता एसी लाेकलने प्रवास करण्यास पसंती देऊ लागले आहेत. एसी लाेकलचे तिकीट दर स्थिर आहेत, तर ओला-उबेरचे दर मागणी आणि पुरवठा यावर ठरतात. सकाळ आणि संध्याकाळच्या पीक अवरमध्ये ॲप आधारित टॅक्सीचे दर सर्वाधिक असतात. सणासुदीच्या, सुटी दिवशी तर ओला-उबेरचे दर अनेक पटीने वाढतात.