शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामांना मुख्यमंत्र्यांचा ‘स्टे’; यादी तयार करण्याचे निर्देश

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेना आमदारांना डावलून त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधी देत असल्याच्या गंभीर तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी केल्यानंतर आता अशा कामांना स्थगिती देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 

आदिवासी विकास विभागामार्फत ३०/५४ या शीर्षांतर्गत आदिवासी भागात रस्ते विकासाची कामे केली जातात. आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी त्यासाठीचा निधी वाटताना शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये विशिष्ट कंत्राटदार व काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संबंधित लोकांना कोट्यवधी रुपयांची कामे दिली अशी लेखी तक्रार शिवसेनेच्या २५ आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत या कामांच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेबाबतची कार्यवाही करू नये, तसेच कार्यारंभ आदेश देखील देऊ नयेत, असे स्पष्ट आदेश आदिवासी विकास विभागाने आता काढले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी विभागाला तसे आदेश दिल्यानंतर हे फर्मान काढले गेले. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याची जबाबदारी पूर्णतः संबंधित जिल्हा परिषदेचे सीईओ आणि  कार्यकारी अभियंत्यांची (सार्वजनिक बांधकाम) असेल, असे आदेशात म्हटले आहे. ग्रामविकास विभाग, अल्पसंख्याक विकास यासह कोणत्या विभागांकडून  शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात परस्पर कामे दिली गेली, याची यादी तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. 

एकूणच शिवसेना आमदारांवर निधी वाटपाबाबत होत असलेल्या अन्यायाचा लेखाजोखा तयार करण्याचे काम समन्वयक म्हणून आ. आशिष जयस्वाल यांच्याकडे असून त्यांच्यासोबत अनिल बाबर, चिमणराव पाटील आणि प्रकाश आबिटकर हे आमदार असतील. यामुळे आणखी काही मनमानी कामांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.

अधिकारी निरुत्तर

काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कामे दिली गेली असे एक तरी उदाहरण आहे का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत केला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. मी विश्वासघात हा शब्द वापरणार नाही पण हे दुसरे काय चालले आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील शिवसेना आमदारांची मंगळवारी रात्री जी बैठक झाली त्यात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला गेला अशी तक्रार पाटील यांनी स्वत: च केली. ‘काळजी करू नका, मी बघतो’ असे मुख्यमंत्री त्यावर म्हणाले. त्यामुळे या कामांवर ही लवकरच गंडांतर येण्याची शक्यता आहे.

कोरेगावचे (जि. सातारा) शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघातील एका ग्रामपंचायतीत १२ सदस्य हे शिवसेनेचे आहेत पण तिथे राष्ट्रवादीचा एकच सदस्य असताना त्याला एक कोटी रुपयांचा निधी दिला गेला. ग्रामविकास विभागाच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली तरीही निधी दिला गेल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *