देशातील अनोख्या क्रांतीकारी स्तंभाचे आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण

देशातील अनोख्या क्रांतीकारी स्तंभाचे आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण

⭕’या’ स्तंभाला शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा : नऊ गाव दिक्षा भूमी संघटनेची मागणी

रत्नागिरी /जिल्हा प्रतिनिधी

संपूर्ण देशवासीयांना अनोखा अशोक मुद्रांकित क्रांतिकारी स्तंभ रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे पाहायला मिळणार आहे. नुकताच या स्तंभाचा लोकार्पण सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले की, भिमा कोरेगाव येथे ऐतिहासिक स्तंभ उभारला आहे. त्याप्रकारे हा देशातील अनोखा धम्म चक्र मुद्रांकित स्तंभ या नऊ गाव दिक्षा भूमीत ऐतिहासिक स्तंभ उभारला आहे. हा अशोक चक्र मुद्रांकित स्तंभ येणाऱ्या काळात रत्नागिरी जिल्ह्याचे वैभव ठरणार आहे, असे आंबेडकर म्हणाले. या ऐतीहासिक स्तंभासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचेच आंबेडकरांनी अभिनंदन करत वैशाख पौर्णमेच्या ही शुभेच्छा दिल्या.

क्रांति स्तंभ घडवणारे राजस्थानातील राजकुमार सोहनी, अशोक धम्म चक्रांकित मुद्रा धम्मदान देणाऱ्या पुष्पलता गंगाराम जाधव आणि स्तंभाचे आरेखन तयार करणारे अविनाश जाधव यांच्यासह श्रमदान करणाऱ्या कलाकारांना आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सन्माचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातील शिव, शाहू, फुले, आंबेडकर चळवळीतील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दाखल होऊन मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

नऊ गावातील बौद्ध बांधवांच्या एकोप्यातुन जमा केलेल्या देणगीतुन आणि बौद्ध दिक्षा भूमी विकास समितीच्या तब्बल ६५ वर्षाच्या अविरत प्रयत्नांनी अनोख्या दिक्षा भूमी क्रांतीकारी स्तंभ उभारला गेला आहे. अनेक वर्षाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नऊ गावातील सामाजिक कार्यकर्त्यानी खूप परिश्रम घेतले. त्यानंतर बौद्ध दिक्षा भूमी विकास समिती या संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या माध्यमातून मुंबई अध्यक्ष अनिल जाधव तसेच स्थानिक समितीचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी पुढाकार घेतला आणि नऊ गावातील बौद्ध बांधवांचे अनेक वर्षाचे दिक्षा भूमी क्रांती स्तंभ उभारणीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. नऊ गावातील बौद्ध बांधवाच्या देणगीतून लाखो रुपये खर्च करून हा अनोखा क्रांतिकारी स्तंभ उभारण्यात आला असून हे कार्य अनेक गावांना प्रेरणा देणारे आहे.

या स्तंभाला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा…

देशातील अनोखा अशोक चक्र मुद्रांकित स्तंभ हा रत्नागिरी तालुक्यात आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव स्तंभ ओळखला जाणार आहे. स्थापत्य कलेतील विशिष्ठ शैलीत हा स्तंभ उभारण्यात आला आहे.
संपूर्ण स्तंभाचे काम पांढऱ्या अंबाजी मार्बल आणि व्हीएतनाम मार्बलमधे राजस्थान येथे करण्यात आले आहे. या क्रांती स्तंभाचा इतिहास देखील महत्वपूर्ण आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भदंत आनंद कौशल्यानंद यांनी १६ मे १९५७ साली करबुडे येथे रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली. यामधे फणसावळे, भोके, निवळी, वेतोशी, जांभरून, खरवते, करबुडे, केळ्ये, या प्रमुख गावांचा समावेश होता. मात्र ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दिक्षा दिली, अगदी त्याच ठिकाणी एक वास्तू उभारावी असे नऊ गावातील बौद्ध बांधवांचे स्वप्न होते. ते आता ६५ वर्षानंतर अनोखा दिक्षा भूमी क्रांतिकारी स्तंभ उभारून स्वप्न साकार झाले आहे. त्यामुळे या देशातील एकमेव अशोक चक्र मुद्रांकित स्तंभाला शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी दिक्षा भूमी विकास समिती या संघटनेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान विविध सामाजिक, धार्मिक ,सांस्कृतिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या स्तंभाचे महत्व विशद करून संघटनेने केलेल्या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर १९५७ साली धम्मदिक्षा घेतलेल्या घेतलेल्या आणि या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याला साक्षीदार असणाऱ्या नऊ गावातील असंख्य पुण्यवान ज्येष्ठांचा गौरव करण्यात आला. तसेच सत्यशोधक सामाजिक संघटनेच्या वतीने कोकणचे गाडगे बाबा काका जोशी, माझी सरपंच बा. गो. कळंबटे, प्रीतम आयरे, सावंत गुरुजी यशवंत जाधव तसेच विविध स्तरांवर समाज हितासाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्यास अंकुश जाधव ,विजय जाधव , रविंद्र जाधव , दिलिप जाधव , अजित जाधव , शैलेश जाधव , अजित कांबळे , अशोक जाधव , दत्ताराम सावंत , मिलिंद प्रतिष्ठान , रघुनाथ सावंत , प्रशांत मेश्राम ,गौतम जाधव प्रमोद जाधव , विश्वजीत जाधव ,दिपक कांबळे , प्रकाश जाधव ,अमित जाधव , जवळपास दशकभर रूग्ण शैय्येवर असणारे तुकाराम जाधव , रविंद्र जाधव , रोशनी जाधव ,धर्मादास मोहिते , शैलेश जाधव , सुरेंद्र जाधव , विलास सावंत , सावंत गुरूजी आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *