जागतिक अशांततेच्या काळात सामर्थ्यवान भारत आज जगासाठी नवी आशा: PM मोदी

बडोदा : कोरोनासाथ आणि जागतिक अशांततेच्या, संघर्षाच्या काळात भारत एक सामर्थ्यवान देश म्हणून पुढे आला आहे. असे सांगतानाच जगासाठी भारत आज एक नवी आशा आहे आणि अनेक समस्यांवरील उत्तरेही काढली जात आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. 

गुजरातच्या बडोदा शहरात कुंडलधामस्थित स्वामिनारायण मंदिर आणि करेलीबागच्या स्वामिनारायण मंदिराकडून आयोजित युवा शिबिरात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही अशा एका नव्या भारताची जडणघडण करत आहोत, ज्याची ओळख नवी असेल. जो देश भविष्याकडे पाहत असेल, पण त्याची परंपरा प्राचीन असेल. 

मोदी म्हणाले की, कोरोनासाथीच्या संकटाच्या काळात देशाने लसी आणि औषधांचा पुरवठा केला. जागतिक अशांतता आणि संघर्षाच्या काळात एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून भारत पुढे आला आहे. त्यामुळेच देश आज जगासाठी एक नवी आशा बनला आहे. हवामान बदलाच्या धोक्याबाबत ते म्हणाले की, आज भारतच असा देश आहे, जो अशा अनेक प्रश्नांवर उत्तरे शोधत आहे, नेतृत्व करत आहे.

सॉफ्टवेअर ते स्पेसपर्यंत नव्या भविष्यासाठी तयार 

– मोदी म्हणाले की, सॉफ्टवेअर ते स्पेसपर्यंत एका नव्या भविष्यासाठी तत्पर देश म्हणून आम्ही पुढे येत आहोत. देशाच्या या यशाचे श्रेय देशातील युवकांना असल्याचे ते म्हणाले. 

– स्टार्टअपचा उल्लेख करून ते म्हणाले की, या क्षेत्रात भारत आज जगातील तिसरा सर्वात मोठा इकोसिस्टी आहे. त्यांनी युवकांना आवाहन केले की, १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत त्यांनी डिजिटल देवाणघेवाण करावी आणि नगदी व्यवहार करू नये. असे केल्यास देशात एक नवी क्रांती येऊ शकते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *