राज्यातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड” प्रणालीमधील तांत्रिक अडचणीबाबत वस्तुस्थिती
शासन निर्णय क्र. शिप्रधो -२०१९/प्र.क.४३/प्रशिक्षण दि.२० जुलै २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयानुसार मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग व मा. शिक्षक आमदार (सर्व) यांच्या विविध संयुक्त बैठकांमध्ये गेल्या काही वर्षात सदर प्रशिक्षणे न झाल्याने राज्यातील सुमारे ९४००० हजार शिक्षक यापासून वंचित असल्याने एकाचवेळी सर्व लाभार्थी यांचे प्रशिक्षण पूर्ण होण्याच्या दृष्टीने सदर प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.
सदर कार्यालय व “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड” यांच्या मध्ये कोर्स विकसन व अनुषंगिक बाबी यासाठी विविध बैठका घेण्यात आल्या. तद्नंतर मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या हस्ते व मा. सचिव, शालेय शिक्षण विभाग यांच्या उपस्थितीत “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड” व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मधील सामंजस्य करार दि.२७ एप्रिल २०२२ रोजी पार पाडण्यात आला.
सदर करारातील तरतुदीनुसार दोन्ही कार्यालयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची जबाबदारी
- प्रशिक्षण साहित्य ( वाचन साहित्य, व्हिडिओ, स्वाध्याय, अभिप्राय, चाचण्या) विकसित करणे
- सदर साहित्याचा वापर करून अध्ययन करण्यासाठी कोर्स तयार करणे.
- सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी यांची माहिती इन्फोसिस यांना पुरविणे.
इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांची जबाबदारी - राज्याच्या गरजेनुसार “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड” प्रणाली राज्यास विकसित करून उपलब्ध करून देणे.
- राज्याने पुरविलेल्या वापरकर्त्यांच्या (USER) यादीनुसार वापरकर्त्यांना प्रणाली वापरासाठी उपलब्ध करून देणे.
- वापरकर्त्यांना ईमेल द्वारे त्यांचा Login ID , Password कळविणे.
- राज्याने पुरविलेल्या वापरकर्त्यांच्या (USER) यादीनुसारच्या वापरकर्त्यांना (USER )प्रणाली सतत वापरास योग्य राहील याची खात्री करणे.
- राज्याने पुरविलेल्या वापरकर्त्यांच्या (USER) यादीनुसार प्रणाली वापराचा डेटा राज्यास उपलब्ध करून देणे.
उपरोक्त नुसार सदर कार्यालयाने वरिष्ठ व निवड श्रेणी साठी ८ कोर्स चे विकसन दि.२२ मे २०२२ रोजी पूर्ण केले. दि.२२ मे ते दि. ३० मे २०२२ या कालावधीत मार्गदर्शक, वक्ते व तंत्रस्नेही शिक्षक यांना सदर प्रणाली पायलट वापरासाठी व परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड” यांना प्रशिक्षणार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आली.
दि. ०१ जून २०२२ रोजी सर्व ९४५४५ वापरकर्त्यांना युट्यूब लाइव्ह सत्राद्वारे प्रणाली वापराचे सत्र घेण्यात आले व सर्व वापरकर्त्यांना इमेल द्वारे सदर प्रणाली वापरण्यासाठी खुली करण्यात येत असून यासाठी आवश्यक Login ID व पासवर्ड कळविण्यात आले. तसेच सदर कार्यालयामार्फत सविस्तर सूचना देणारे पत्र देखील निर्गमित करण्यात आले.
दि.०२ जून २०२२ रोजी काही सदर प्रशिक्षणार्थ्यांनी प्रणालीचा वापर करण्यात अडचणी येत असल्याचे नमूद केले. यानुसार दि.०२ जून २०२२ रोजी सदर कार्यालयामार्फत “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड” यांना तत्काळ कळविण्यात आले. तसेच याबाबतचे निवेदन प्रशिक्षणाच्या https://training.maharashtra.ac.in या वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात आले. याचसोबत याबाबतचे निवेदन सर्व प्रसारमाध्यम यांना देखील देण्यात आले. दि.०३ जून २०२२ रोजी “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड” द्वारे सर्व वापरकर्त्यांना सदर प्रणालीमध्ये इन्फोसिस च्या Security Update मुळे काही त्रुटी आल्याने “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड” ची जगभरातील सेवा पुढील काही काळासाठी बंद ठेवण्यात येत असून सेवा सुरळीत होताच आपणास कळविले जाईल असे कळविण्यात आले.
तथापि दि.०३ जून २०२२ रोजी दुपारी सदर पोर्टल व्यवस्थित कार्य करत असल्याचे इन्फोसिस यांनी सदर कार्यालयास कळविले. याबाबत इन्फोसिस टीम सोबत दि.०३ जून, दि.०४ जून, दि.०५ जून व दि.०६ जून २०२२ रोजी VC द्वारे तसेच यातील दि.०४ जून व दि.०५ जून रोजी शासकीय सुट्टी असून देखील पूर्णवेळ संबंधित अधिकारी यांनी कार्यालयात उपस्थित राहून विविध बैठका घेऊन प्रणाली व्यवस्थित काम करत असल्याची व राज्यातील प्रशिक्षणार्थी सदर प्रणालीचा वापर करत असल्याची खातरजमा करून घेतली .
तथापि या दरम्यान या संदर्भात काही वर्तमानपत्रात तथ्यहीन बातम्या व संघटना यांची निवेदने यानुसार अनेक वापरकर्त्यांना युझर आय.डी व पासवर्ड तपशीलबाबत ईमेल मिळाले नसल्याची तक्रार करण्यात आली आहे, यासाठी विभागाचे कोणतेही मत विचारात घेतले नाही. तथापि याची वस्तूस्थिती पुढीलप्रमाणे
अ.क्र तपशील संख्या %
- ईमेल यशस्वीरित्या प्राप्त 90437 95.65 %
- ईमेल प्राप्त न झालेले 2680 2.83 %
- चुकीचे ई मेल 35 0.04 %
- दुबार अथवा अनेक वेळा वापरलेले ईमेल 1153 1.22 %
- दुबार नोंदणी रद्द 240 0.25 %
- एकूण 94545 100.00
दि.०३ जून २०२२ पासून पोर्टल सुरळीत सुरु असल्याने सर्व प्रशिक्षणार्थी यांना “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड” प्रणाली वापरास उपलब्ध असल्याचे सूचित न करता देखील दि.०६ जून २०२२ रोजी सदर प्रणालीचा वापर करणाऱ्या राज्यातील प्रशिक्षणार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे
दि.०६ जून २०२२ रोजीची “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड” प्रणालीचा वापर करून प्रशिक्षण सुरु करण्याची आकडेवारी
तपशील लॉगीन करून प्रशिक्षण सुरु करणारे प्रशिक्षणार्थी प्रणाली लॉगीन आय.डी मिळूनही प्रशिक्षण सुरु न करणारे प्रशिक्षणार्थी एकूण
संख्या 67326 27219 94545
पैकी ९०४३७
% ७४.४४ % 2५.५६ % 100
सदर अहवालाचा जिल्हानिहाय तपशील देखील सोबत जोडला आहे .
प्रणालीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदविलेल्या ईमेल दुरुस्त करण्याची सुविधा या कार्यालयामार्फत https://training.maharashtra.ac.in उपलब्ध करून देण्यात आली होती व सद्यस्थितीत देखील ती सुरु आहे. तसेच प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी तक्रार नोंदणी व निराकरण सेवा, दैनंदिन शंका समाधान सत्र (१००० व्यक्तींसाठी लाइव्ह) अशा सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरीदेखील काही प्रशिक्षणार्थी यांनी सदर प्रक्रिया पूर्ण न केल्याने, चुकीची माहिती भरल्याने, चुकीचा प्रशिक्षण प्रकार निवडल्याने त्यांना युझर आय.डी , पासवर्ड मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. प्रशिक्षणार्थी यांची विविध उद्बोधन सत्रे यु ट्यूब द्वारे घेण्यात आली आहेत व प्रशिक्षणाची सर्व माहिती प्रशिक्षणार्थ्याना इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड तर्फे इमेल, पत्र, Whats App, वेबसाईट या द्वारे वेळोवेळी कळविण्यात येत आहे.
उपरोक्त माहितीचे अवलोकन करता व इन्फोसिस यांच्या इमेल नुसार त्यांच्या प्रणालीवरील तांत्रिक अडचणीमुळे (Security Path Update) मुळे केवळ दि.०२ जून २०२२ ( १ दिवस) त्यांची इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणाली सर्व्हर डाऊन होती. याचा पूर्ण तांत्रिक तपशील इन्फोसिस यांच्याकडून मागविले आहेत, उपलब्ध होताच संपूर्ण माहिती आपल्याला देखील पाठविली जाईल.
उपरोक्त वस्तुस्थितीदर्शक माहितीचे अवलोकन केले असता सदर कार्यालयाने सदर प्रशिक्षण उत्तमरीत्या उपलब्ध करून देण्याची सर्व आवश्यक कार्यवाही अत्यंत कमी वेळात व अत्यंत दर्जदार पद्धतीने पार पाडली असताना देखील इन्फोसिस प्रणालीमध्ये अचानक आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षणाबाबत काही आलेल्या नकारात्मक बातम्या या वस्तुस्थितीस अनुसरून नाहीत हे आपल्या नम्रतापूर्वक निदर्शनास आणू इच्छितो.
सद्यस्थितीत सदर प्रणाली अतिशय सुरळीत सुरु असून पुढील काही दिवसात राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थी यांचे गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असणारे सेवांतर्गत प्रशिक्षण उत्तमरीत्या पूर्ण करण्यात येईल याची सदर कार्यालय खात्री देत आहे.
( रमाकांत काठमोरे )
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे