
शनिवार दिनांक 11 मे रोजी सांगली निवारा भवन येथे आशा व गटप्रवर्तक महिलांचे तिसरे जिल्हा अधिवेशन संपन्न!
ऑक्टोबर 2022 मध्ये दिल्लीमध्ये जाणाऱ्या देशव्यापी आशांच्या मोर्चासाठी जोरदार तयारी करण्याचे आवाहन!
अधिवेशनाच्या सुरुवातीस देशातील महिला क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अधिवेशनास सुरुवात झाली.
त्यांनतर मागील तीन वर्षाचा आशा संघटनेच्या कामकाजाचा अहवाल संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी यांनी मांडला.
महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी बोलताना सांगितले की, देशामध्ये दहा लाखापेक्षा जास्त आशा व गट प्रवर्तक महिला काम करीत आहेत. Kovid 19 च्या भयानक महामारी काळामध्ये देशातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली आहे. त्यापासून अनेक रुग्णांना जीवदान देण्यामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेकडून देशातील आशा व गटप्रवर्तक महिलांचा गौरव केलेला आहे. परंतु भारत सरकार मात्र या आशा व गटप्रवर्तक महिलांचे केवळ कोरडे अभिनंदन करून प्रत्यक्षात त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे नाकारत आहे. म्हणूनच शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी 2022 ऑक्टोबरमध्ये आयटकच्या वतीने आयोजित केलेल्या दिल्ली पार्लमेंटवरील मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातून किमान ५०० महिला दिल्लीस जातील असा अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात आला.
तसेच महाराष्ट्र शासनाने एक जुलै 2021 पासून आशा महिलांना दरमहा एक हजार रुपये मानधन वाढ व गटप्रवर्तक महिलांना बाराशे रुपये मानधन वाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यामुळे एक जुलै २०२२ रोजी मागील अकरा महिन्याचा संपूर्ण फरक मिळण्यासाठी आयटकच्या वतीने सर्व जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यासाठी अध्यक्ष म्हणून कॉ विद्या कांबळे व संघटनेच्या जनरल सेक्रेटरी म्हणून कॉ सुमन पुजारी यांची निवड केली. तसेच सांगली जिल्हा कमिटीची निवड करण्यात आली. या अधिवेशनामध्ये उर्मिला पाटील, अंजली पाटील, सुनिता कुंभार ,ज्योती निचळ, रेखा परीट इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.
अधिवेशनामध्ये भुवनेश्वर येथील अखिल भारतीय पातळीवरील आशा कार्यकर्त्यांच्या बैठकीस गेलेल्या कॉ विद्या कांबळे यांचा जोती नीचळ यांच्या हस्ते,कॉ शंकर पुजारी यांचा अंजली पाटील यांच्या हस्ते व कॉ ऊर्मिला पाटील यांचा सुमन पुजारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ सत्कार करण्यात आला.
. असे पत्रक महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन शंकर पुजारी यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे
