मुंबई : गेल्या दोन दिवसापासून मुंबईसह कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्याचबरोबर कोकणात पावसाची तीव्रता अधिक असण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मुंबईत जोरदार पाऊस (Heavy Rain in Mumbai) होत आहे.
हवामान खात्याने म्हटले आहे की,उद्या रविवारी १२ जूनपासून राज्यात पुढील पाच दिवसासाठी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
नैऋत्य मान्सून ११ जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पूर्वी वर्तवला होता. मात्र आता १५ जूनच्या दुपारी किंवा सायंकाळपर्यंत पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे. गेल्या २४ तासांत जुहू विमानतळ परिसरात ५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी ११ जून या अधिकृत तारखेच्या दोन दिवस आधी९जूनला मान्सून मुंबईत दाखल झाला होता. शुक्रवारी दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस झाला. स्कायमेट वेदरने दिलेल्या माहितीनुसार,हा पहिला मान्सूनपूर्व पाऊस होता. या पावसाने मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले होते तर लोकल सेवेचा खोळंबा झाला होता.