प्रबोधनकार ठाकरे यांना जाणवेधारी हिंदुत्व कधीच मान्य नव्हते. मात्र त्यांचे सुपुत्र दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी नेमका त्याचाच स्विकार करून ब्राह्मणी हिंदुत्ववादी विचारसरणीने नाकारलेल्या इथल्या शुद्राती शूद्र म्हणजेच ओबीसीं ते चर्मकार , धेडांना तुंम्ही हिंदू आहात म्हणून हिंदुत्ववाच्या , हिंदू धर्माच्या भजनी लावून त्याला कट्टरपंथी बनविले व आपल्या राजकारणाची सोय केली. या शूद्राती शूद्रां समोर जानवेधारी ब्राह्मणी हिदुत्वाचा स्विकार केल्या नंतर कायमचं मुसलमानांच्या हिरव्या संकटाचा बागुलबुवा उभा करून स्वताची हिंदू ह्रृदयसम्राट म्हणून प्रतिमा उभी केली. राष्ट्रीय काँग्रेस, इंदिरा गांधी , राजीव गांधी आणि महाराष्ट्रातील शरद पवार तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुस्लिम धार्जिणे आणि दलितांचे हितं सांभाळणारे राजकीय पक्ष असून हिंदूंच्या हित रक्षणासाठी महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रीय पातळीवर फक्त भाजप असल्याचे चित्र उभे केले. आज जो भाजपचा भस्मासुर वाढला आहे तो मुळातच वाढविणारे हात कुणाचे असतील तर ते शिवसेनेचे आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचेच होते. भारतीय जनता पक्षाचे जे काही अस्तित्व निर्माण झाले आहे त्यात भाजपाची मेहनत जितकी आहे त्यापेक्षा जास्त मेहनत बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत सांगायचे झाले तर “पोरं जन्माला घालायला ढोपरं झिजवली ती शिवसैनिकांनी …. ” आणि त्यामुळेच भाजपला महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील सत्तेची दहिहंडी खुणाऊ लागली. जसे बाळासाहेब ठाकरेंनी इथल्या ओबीसीं बहुजनांना हिंदुत्त्वाची भूरळ घातली तशीच भाजप मधील दिवंगत गोपीनाथ मुंडे या बहुजन चेहरा पुढे करून या समाजाची फसगत करण्यात आली .
कोणत्याही परिस्थितीत , कोणत्याही मार्गाने राजकीय सत्ता हस्तगत करायचीच अशी धारणा निर्माण करून त्यासाठी भाजपने प्रभू रामचंद्रांचा यथेच्छ वापर केला. रामजन्मभूमी , बाबरी मशिदीच्या तव्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतली. जेव्हा बाबरी पाडली गेली तेंव्हा बाबरी पतनाचे खापर हे शिवसेनेवर फोडून भाजपाचे कातडी बचाव नेतृत्वाला जनाची नाही मनाचीही लाज वाटली नव्हती. आणि तेंव्हाच लोकनेते बाळासाहेब ठाकरेंना हे समजायला हवे होते की , आपणं मित्राला नाही तर दगलबाज शत्रूला मोठा करीत आहे. परंतू महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ या भ्रमात राहिलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या पदराखाली वाढणा-या भाजपचे मनसुबे हे शिवसेनेला गिळंकृत करण्याचेच होते हे न समजणे हे राजकीय शहाणपण म्हणता येणार नाही. कधी कधी बाळासाहेब ठाकरे कमळाबाई कडे डोळे वटारून दमबाजी केली की , गोपीनाथ आणि प्रमोद महाजन हे नतमस्तक होऊन मधाची धार सोडली की त्या धारेने बाळासाहेब ठाकरे सुखाऊन जायचे… त्यांना आपला धाक कायम आहे याचे समाधान व्हायचं. मात्र पोटात शिरून कोथळा बाहेर काढणा-या भाजपाचे मनस्वी हेतू जाणून घेण्यात बाळासाहेब ठाकरेंना यश आले नाही हेही सत्य नाकारता येणार नाही. शिवसेनेच्या जोडीने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या भाजपाने बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच शतं प्रती शतं धोरणं आखून शिवसेनेला संपविण्याची रणनीती आखून अंमलबजावणीसाठी सुरुवात केली होती. आणि त्याचाच प्रत्यय पुढील काळात महाराष्ट्राच्या सत्तेवर आपली मांड सुद्धा ठोकली. परंतु जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तोपर्यंत भाजपाने आपली विश्वास घातकी नखं बाहेर काढण्याची हिंमत दाखविली नसली तरी ती बाहेर येणारच नाही असे मात्र घडले नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजपाने आपली विश्वास घातकी संस्कृतींचे रंग उधळायला सुरुवात केली आणि पंचवीस वर्षे आमची युतीत सडली म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मर्यादांची जाणीव राखून निवडणुकीत क्षमतेनुसार यश मिळवून शतं प्रती शतंला लगाम घातला. आणि पुन्हा एकदा समान हिंदुत्ववादी भूमीकेवर ” तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना ” म्हणत सेना-भाजप सत्तेच्या सुंदरी साठी एकत्र नांदू लागले. मात्र आता सेनेला दुय्यम स्थानावर समाधान मानण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. सेनेतील सत्तेला चटावलेली खोड सत्तेशिवाय राहू शकत नव्हती आणि म्हणूनच नाही नाही म्हणता सेनेला सत्तेत सहभागी व्हावे लागले होते त्याच कारण आमदारांनी बंड करूं नये म्हणूनच..! हे प्राक्तन चुकले का….? तर नाही…! २०१९ च्या निवडणूकीत किडक्या आवाजात फडणवीसांनी कोथळा काढू ,दात मोजू वैगरेच्या इशा-या नंतर विकोपाला गेलेले संबंधांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा युतीत लढून मा. उद्धव ठाकरे यांनी ५५ आमदार निवडून आणले. (आता फुटलेल्या आमदारांना मा. उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व मान्य आहे की नाही हे तेचं सांगू शकतात ) आणि अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या बोलीला हरताळ फासला गेल्यामुळे आता हे ” उठं रांडे बसं पाठावर ” नक्कीच नको या निर्णयाला येतं सम हिंदुत्ववादी विचारसरणी बाजुला ठेवून कालपर्यंत ज्या राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडणा-या बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू पश्चात त्याच्यांच राजकीय वारसदार मा. उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी करून त्यांच्या सोबतीने सत्तेचे सोपान चढणा-यांना आणि त्यांच्या चाणक्यांना मा. उद्धव ठाकरे यांच्याच खुर्ची खाली , एकेकाळच्या पदराखाली वाढणा-या भाजपच्या फडणवीसांनी सुरंग पेरणी करून ठेवली आहे याची माहिती नसावी? वरकरणी वाटणारी पाठिंब्याच्या खुर्चीचे स्व हातानेच पायच कापायला सुरुवात केली होती. ज्याची कल्पना सत्तेच्या चाव्या मिळालेल्या मान उद्धवजी ठाकरे यांच्या लक्षातच येऊ नये हे दुर्दैव म्हणावे की राजकीय अपरिपक्वता म्हणावी. अगदी मातोश्रीच्या ओसरीला आणि एकुणच असणारे आमदारांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत खुर्ची खाली चूड लावल्याची ही जाणीव होऊ नये?
मान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिवसेनेचे विधानसभा गटप्रमुख राहिलेल्या वर्तमान काळीन हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे यांना तेव्हा राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची अनैसर्गिक युती कदाचित मान्य होती ती शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे म्हणून असेल. बहुदा त्यावेळी मुख्यमंत्री पदाची माळ आपल्याच गळ्यात पडेल अशी अपेक्षा असावी म्हणून ही अनैसर्गिक युतीला तेंव्हा विरोध केला नसावा. मात्र जेव्हा विराजमान मुख्यमंत्री लोकप्रिय होत आहेत , आणि आपल्याला ती पुन्हा संधी उपलब्ध होईल की नाही याची शाश्वती नाही असे जेव्हा वाटू लागले. त्यांतच विरोधकांना इडी , सीबीआय आणि तत्सम यंत्रणा वापरून जेरबंद करण्याच्या भाजपच्या धोरणाने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील शिवसेनेच्या विद्यमान आमदार , खासदार आणि महानगरपालिकेतील लुटारू नगरसेवक ,नैतृत्वाला आपला मुख्यमंत्री असूनही तो आपल्याला , आपल्या भ्रष्टाचाराला वाचविण्यात अपयशी ठरतोय. तर मग आपणं तरी कशाला पाठराखण करावी असा व्यवहारी दृष्टिकोन ठेवून जर सुरतेशी संधान बांधले असेल तर….. आणि त्यासाठी आपणास मोठ्ठं कारणं जर कोणतं पुढे करता येईल तर ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे…. होयं…हेचं आपले अमोघाश्त्र आहे . असा विचार करून मान एकनाथ शिंदे यांनी आंम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत , आंम्हाला बाळासाहेब ठाकरेंचेच हिंदुत्ववादी विचारसरणी मान्य आहे. आजची शिवसेना ही बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारसरणी पासून दूर गेली आहे . आणि म्हणूनच राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस याच्या सोबतची सत्तेची युती तोडून भाजपाशी घरोबा करावा अशी जी मागणी केली आहे. याचाच अर्थ असा नाही का की , उद्धवजी ठाकरे यांनी जे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा जो मुद्दा मांडून भाजपने दगाबाजी केल्याचा जो दावा केला होता तो खोटा होता किंवा देवेंद्र फडणवीस हेचं खरे होते . आणि यांतील जे काही सत्य होते तेव्हा ते महाराष्ट्राच्या जनते समोर तेव्हा एकनाथ शिंदे यांनी का आणले नाही …? की तेव्हा एकनाथ शिंदे आणि आता त्यांच्या सोबतीला गेलेले जवळजवळ शिवसेनेचे ३५ पेक्षा जास्त आमदारांना तेव्हा तो स्वताच्या सोयीचा वाटला होता म्हणून विरोध केला नाही. मात्र आता हे सर्व त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या हिदुत्वाचा आधार घेऊन मुख्यमंत्री मान उद्धवजी ठाकरे यांची खुर्ची आणि शिवसेना पक्षप्रमुख पदालाच आव्हान दिलेले आहे. आज पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे हे विश्वासाने हेही सांगू शकत नाही की त्यांच्या पक्षाचे किती आमदार खासदार नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत , पक्षांवर त्यांचीच पक्कड आहे का? म्हणून इतकी अगतीकता आणि दुर्बल ,शक्तीहिनता एकनाथ शिंदे यांनी उद्धवजी ठाकरे यांच्यावर आणली आहे ती स्वर्गिय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांचा आधार घेऊन गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेला पडलेल्या भगदाडावर बोलायला उद्धव ठाकरे यांनी मुहूर्त शोधला तो सर्व पर्याय संपल्यानंतर . म्हणजेच दुसऱ्या दिवशी सुर्य मावळतीला जाताना….. महाराष्ट्राच्या जनतेच्या नावाने बंडखोरांना उद्देशून केलेल्या भावनिक भाषणात “मी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून तुम्हांला मान्य नसेन तर मला येऊन सांगा , मी दोन्ही पदावरून पायउतार व्हायला तयार आहे. असे विनम्रपणे दिणवाणे होऊन सांगण्याची वेळ आली आहे ती कुणामुळे??
उद्धव ठाकरें यांनी भावनिक साद घातल्यानंतर शिवसेनेच्या अस्तित्वाचाच कायदेशीर प्रश्न निर्माण झाला तेंव्हा सर्व प्रथमतः माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांची ABP माझाने घेतलेली मुलाखत , त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी केलेली कायदेविषयक मार्गदर्शन आणि त्यानंतर शिवसेनेचे बाजूने उभे राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज तरी सरकार अस्तित्वात असल्याचे दिसून येते आहे .त्याच बरोबर ज्या बाळासाहेब ठाकरेंनी कायमचं राष्ट्रीय काँग्रेस संपविण्यासाठी , त्यांच्या घराणेशाही वर घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या , आंबेडकरी चळवळीची टिंगलटवाळी केली ते सर्वजण आपापल्या परीने शिवसेना वाचविण्यासाठी हस्ते परहस्ते मदत करताना दिसले.तर ज्या भाजपाला हिंदुत्वाच्या नावाने मांडीवर बसविले होते तीच भाजपाचे धुरीण शिवसेना संपवायला निघतात हा नियतीने उगविलेला सूड म्हणायचा की काय…. शिवसैनिक याचे कधीतरी आत्मपरिक्षण करणारं आहेत की नाही.की पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीत हिंदुत्ववादी म्हणून जिथे शिवसेना नाही तिथे भाजपच्या शेंडी जाणव्याच्या ब्राह्मणी हिंदुत्ववादी उमेदवार निवडून आणणारं आहेत?
बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भुमीके मुळेच स्वर्गिय बाळासाहेबांच्या भुमीकेचा शस्त्रा सारखा वापर मान एकनाथ शिंदे यांनी केला आहे .मान नाम.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही .ते भारतीय संविधानाच्या प्रावर्धानानुसार विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाऊन जर विश्वास दर्शक ठराव जिंकला किंवा हरले तरीही तो नियतीचा न्याय म्हणावा लागेल . कारणं स्वर्गिय बाळासाहेब ठाकरेंना लोकशाहीवर नाही तर ठोकशाही वरचं विश्वास होता. आणि याच ठाकरी ठोकशाहीच्या बळावर सर्वांच्या विरोधाला ठाकरी बाण्याने फाट्यावर मारून त्यांनीच नियुक्त केलेल्या आपल्या राजकीय वारसदार असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हातून स्वर्गिय बाळासाहेबांच्या संपूर्ण शिवसेना या संघटनेची सुत्रे आपल्या हाती बळकावू बघणा-या एकनाथ शिंदे यांनी कुणाच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून हे धाडसी पाऊल उचलले आहे …..??? यांस जबाबदार कोण…..???
बुध्द म्हणतात गाडी सोबत गाडीच्या चाकांच्या खुणा उमटतं असतात…..
लेखक – अनिल जी जाधव
जिल्हा तालुका – रत्नागिरी