स्वातंत्र्य आंदोलनाची मूल्ये अत्यंत महत्त्वाची

स्वातंत्र्य आंदोलनाची मूल्ये अत्यंत महत्त्वाची

स्वातंत्र्य आंदोलनाची मूल्ये अत्यंत महत्त्वाची ; मौनी विद्यापीठाच्या राष्ट्रीय परिषदेत प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

मौनी विद्यापीठाच्या राष्ट्रीय परिषदेत प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

गारगोटी ता. १३, भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आज आपण नियतीशी केलेल्या कराराची पूर्णांशाने नसली तरी काही अंशाने पूर्ती करत आहोत. आपल्याला प्रत्येक नेत्रातला अश्रू पुसून टाकायचा आहे. ती गोष्ट आपल्या शक्ती बाहेरची आहे असं वाटलं तरी जोवर जगात यातना आणि अश्रू आहेत तोवर आपल्या सेवेचं काम सुरूच असेल असे म्हटले होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना व पुढील पंचवीस वर्षाचे नियोजन करताना आपल्याला हीच भूमिका घेऊन पुढे जावे लागेल.भारताच्या शतकमहोत्सवी वर्षात भारत जगातील एक सर्वार्थाने संपन्न झालेले राष्ट्र झालेले आपल्याला पाहायचं असेल तर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाने घालून दिलेली मूल्ये आणि भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेले तत्वज्ञान याच आधारावर आपल्याला वाटचाल करावी लागेल.
असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. श्री मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे आर्टस,सायन्स, कॉमर्स अँड एज्युकेशन कॉलेज (गारगोटी ) येथे ” भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ‘
” या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आणि बीजभाषण करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मागणी विद्यापीठाचे संचालक प्राचार्य डॉ.आर.डी. बेलेकर होते. यावेळी मंचावर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील, जावडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी बी दराडे उपस्थित होते. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शहाजीराव वारके यांनी स्वागत व प्रस्ताविक केले प्रा.डॉ. युवराज देवाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले ,गेल्या पंच्याहत्तर वर्षात समाजकारणात मूलभूत स्वरूपाचे बदल झालेले आहेत. बदल हा सृष्टीचा नियम असतो. स्थितीवादी असण्यापेक्षा गतिवादी असणं चांगलंच.पण त्या गतीमध्ये प्रगती असायला हवी. अधोगती असता कामा नये याचे भान ठेवण्याची गरज आहे. राजकारण हे केवळ सत्ताकारण बनते आणि धर्म आणि राजकारण यांची सांगड घातली जाते तेंव्हा राष्ट्रीय अधोगती अटळ ठरते.अशावेळी भावनिक प्रश्नांपेक्षा मूलभूत प्रश्नांचं राजकारण पुढे आणण्याची गरज आहे.आहे रे आणि नाही रे वर्गातील तरी वाढत जाणे, बेरोजगारी -महागाई वाढत जाणे,रुपया सतत घसरत जाणे, समन्वयापेक्षा संघर्ष वाढत जाणे, जात्यंधता आणि धर्मांधता वाढत जाणे हे चांगले लक्षण नाही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्या विरोधातील लोकमानस तयार होण्याची नितांत गरज आहे.ती जबाबदारी सुशिक्षितांनी पेलली पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञान, साहित्य, शिक्षण, समाजव्यवस्था ,अर्थव्यवस्था ,राजकारण ,क्रीडाक्षेत्र, कृषीक्षेत्र ,उद्योग व्यापार,शिक्षण,पर्यावरण या सर्व क्षेत्रात बळकटी आणायची असेल तर मध्यमवर्गाने, नव मध्यमवर्गाने विवेकाने विचार करून या सर्व प्रश्नांच्या सोडवणूकीत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या मांडणीमध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडाच्या सविस्तर आढावा घेतला व पुढील दिशा स्पष्ट केली. यावेळी प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.आर. डी. बेलेकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्रीमती एस.एस. पाटील यांनी आभार मानले.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. नंदकुमार मोरे यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये विविध अभ्यासकांनी या विषयावरील आपले शोधनिबंध सादर केले. समारोपाच्या सत्रात प्रा.कॅप्टन अरविंद चौगले यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या परिषदेत प्राध्यापक, अध्यापक ,विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या सहभागी झाले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *