इचलकरंजी: दत्तवाड ग्रामपंचायतीने आवश्यक सर्व उपाययोजना करून त्वरित भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. त्यासोबत नागरिकांनीही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होईपर्यंत खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले. ते दत्तवाड (ता. शिरोळ) येथे चार दिवसांपूर्वी कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालिकेबाबत गाव भेटीप्रसंगी आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिरोळच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे घुमाळ उपस्थित होत्या.
महानगरपालिकांचे श्वानपथक व वन विभागाची टीम ही भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, गावात मोकाट कुत्रे इतके हिंसक का बनले आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच गावातील चिकन, मटन, चायनीज, चिकन ६५ व घावे, खानावळी, हॉटेल्स आदीमधील वेस्टेजचा योग्य प्रकारे ते कुत्र्यांच्या संपर्कात न येता त्यांची
विल्हेवाट लावावी. ग्रामीण रुग्णालय व इतर दवाखान्यात प्रसुती तसेच इतर शस्त्रक्रियेतून जे मानवी वेस्टेज निघते. त्याचीही संबंधित रुग्णालयांनी योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी. त्याचाही मोकाट कुत्र्यांशी संपर्क येऊ नये याची दक्षता बाळगावी, असे आवाहन केले. तहसीलदार
डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनीही कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सरपंच चंद्रकांत कांबळे, मंडळ अधिकारी विनायक माने, तलाठी इक्बाल मुजावर, ग्रामसेवक संतोष चव्हाण, संजय पाटील, बाबूराव पवार, नाना नेजे आदी उपस्थित होते.