वस्त्रोद्योगाला भेडसावणार्‍या समस्या, निर्माण होणार्‍या अडचणी आणिआवश्यक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करावी -आमदार आवाडे

वस्त्रोद्योगाला भेडसावणार्‍या समस्या, निर्माण होणार्‍या अडचणी आणिआवश्यक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करावी -आमदार आवाडे


इचलकरंजी –
वस्त्रोद्योगाला भेडसावणार्‍या समस्या, निर्माण होणार्‍या अडचणी आणि या सर्वातून वस्त्रोद्योगाला सावरण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत त्याचबरोबर आवश्यक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली. त्यावर नामदार पाटील यांनी लवकरच बैठकीचे नियोजन करण्याची ग्वाही दिली.
मागील काही वर्षांपासून वस्त्रोद्योग व्यवसाय विशेषत: यंत्रमाग उद्योग अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. वाढते वीज दर, सूत दर, सुट्ट्या भागांच्या दरात वाढ, कापडाला नसलेली मागणी अशा अनेक संकटातून यंत्रमाग उद्योग कसाबसा सुरु आहे. मागील राज्य सरकारने या यंत्रमाग व्यवसायासाठी प्रत्यक्षात काहीच केले नाही. त्यातच महापूर, कोरोना महामारी संकटामुळे अडचणीत भरच पडली आहे. त्यामुळे राज्य शासनाने या उद्योगाला आर्थिक आधार द्यावा व त्या संदर्भात चर्चा करुन योग्य तो मार्ग काढावा या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. आमदार आवाडे यांनी मंत्रीमहोदयांना वस्त्रोद्योगातील अडचणी संदर्भात विस्तृत माहिती देत आवश्यक उपाययोजनांचीही माहिती दिली.
यंत्रमाग उद्योगाला जर शासनाने मदतीचा हात दिला नाही तर नजीकच्या काळात हा उद्योग पूर्णत: ठप्प होऊन जाईल. पर्यायाने या उद्योगाशी निगडीत सर्वच घटकांचीही वाईट अवस्था होऊन कामगार वर्गावर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळेल. त्यासाठी राज्य शासनाने उपाययोजनांसह जाहीर केलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली आहे. त्यावर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी या सर्वच प्रश्‍नांबाबत लवकरच संबंधित विभाग, अधिकारी व प्रतिनिधींची बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *