निपाणीत १ मार्च रोजी भव्य ‘धम्म परिषद’; सुप्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओहोळ करणार मार्गदर्शन
उत्तर कर्नाटक भारतीय बौद्ध महासभा व शताब्दी महोत्सव समितीचे आयोजन; मान्यवरांचा होणार गौरव
निपाणी: प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रथम पदस्पर्श शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी निपाणी शहरात भव्य ‘धम्म परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ‘जग बदलणारा बाप माणूस’ या ऐतिहासिक पुस्तकाचे लेखक व सुप्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओहोळ मार्गदर्शन करणार आहेत.
या ऐतिहासिक परिषदेच्या अध्यक्षस्थानी उत्तर कर्नाटक भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु. मनोहर मोरे भूषवणार आहेत. निपाणी हे शहर आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र मानले जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीत आठ वेळा निपाणीला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष यशवंतराव (भैय्यासाहेब) आंबेडकर, मीराताई आंबेडकर आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांनीही या भूमीत धम्माचा प्रचार व प्रसार केला असल्याने निपाणीला ‘धम्मभूमी’ म्हणून विशेष ओळख आहे. याच गौरवशाली परंपरेला उजाळा देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
मान्यवरांचा होणार सन्मान
या धम्म परिषदेच्या निमित्ताने शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.
नियोजन बैठकीत मान्यवरांची उपस्थिती
धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रा. डॉ. रवींद्र दिवाकर, डॉ. विक्रम शिंगाडे, ‘डीएसएस’चे संदीप माने, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे शहराध्यक्ष कबीर वराळे, संतोष मेस्त्री, सुशील कांबळे, उदय वंटे, जनार्दन मोहिते, पिंटू माने, जयसिंग कांबळे आणि नवनाथ शिंगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुकाध्यक्ष प्रा. अजित कांबळे यांनी केले, तर आभार दिलीप कांबळे यांनी मानले. या ऐतिहासिक धम्म परिषदेत बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धम्म परिषद व शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी केले आहे.
