कोल्हापूर जिल्ह्यातील राणी मगदूम यांनी मृत्यूनंतरही वाचवले तिघांचे प्राण
डायमंड हॉस्पिटलच्या सतर्कतेने प्रत्यारोपण यशस्वी.
कोल्हापूर: माणूस गेल्यानंतर त्याचा उपयोग दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी होऊ शकतो याचा प्रत्यय आज कोल्हापूरकरांना आला. पैशाचे व इतर वस्तूंचे दान सगळ्यांना माहित आहे. पण अवयवांचे दान ही कल्पना समाजात आणखी रुजली नाही तरीही गरिबीत जीवन जगणाऱ्या एका कुटुंबाच्या औदर्यामुळे तिघांचे प्राण वाचले आहेत.
सांगरूळ येथील चाळीस वर्ष वयाच्या राणी विलास मगदूम यांना मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी डायमंड हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत अतिशय नाजूक असल्याने त्यांना डायमंड हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवूले व सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु त्यांच्या प्रयत्नाना यश आले नाही व राणी विलास मगदूम यांना मेंदुमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर डायमंड हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी व ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर यांनी त्यांच्या कुटुंबीयांना व नातेवाईकांना अवयवदान विषयी माहिती दिली आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रक्रिया त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगितल्या. कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी काही वेळातच त्यांचे अवयवदान करण्यासाठी संमती दिली आणि हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने पुढील कारवाईसाठी तयारी केली. पुणे येथील झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर यांना रुग्ण व अवयवदानाबद्दल माहिती दिल्यानंतर त्यांच्या नियमानुसार यकृत रुबी हॉल पुणे, एक किडनी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर आणि दुसरी किडनी डायमंड हॉस्पिटल यांना देण्यात आली. डायमंड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रात्रभर मेहनत करून पेशंटचे सर्व अवयव शाबूत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. हे अत्यंत अवघड व जिकीरीचे काम करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि पहाटे पाच वाजता अवयव काढण्याची प्रक्रिया चालू केली. सकाळी दहा वाजता ग्रीन कॉरिडॉर करून यकृत पुण्याला पोचवण्यात आले तर साडेदहा वाजता एक किडनी ग्रीन कॉरिडोर करून सोलापूरला सुखरूप पोहोचवण्यात आली. तातडीने डायमंड हॉस्पिटल येथे एक किडनी प्रत्यारोपण करण्यात आली व पुणे व सोलापूर येथेही तातडीने गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन प्रत्यारोपण पार पडले. कोल्हापूर पोलीस दलाकडून ग्रीन कॉरिडॉर स्थापन करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सर्व प्रक्रियांमध्ये तज्ञ डॉक्टर विलास नाईक, डॉ. साईप्रसाद, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर, डॉ. मकरंद जोशी, डॉ. किशोर देवरे, डॉ. दिनेश झिरपे आणि डॉ. ताहेर यांनी अथक परिश्रम घेतले. डायमंड हॉस्पिटल चे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉ. आनंद सलगर आणि धनश्री मिरजकर यांनी योग्य नियोजन केले. कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटल येथे आजपर्यंत 10 पेक्षा अधिक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.