शाळा ; भावी जगण्याची व्हावी कार्यशाळा

शाळा ; भावी जगण्याची व्हावी कार्यशाळा

शाळा ; भावी जगण्याची व्हावी कार्यशाळा

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’
या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

देवांची मंदिरे गगना भिडली। शाळेची उडाली कौल-छत॥
मेलेल्या देवांना सुवर्णालंकार। उघडे ढोपर बालकांचे॥
शाळेतल्या जीवा सुकडी- खिचडी। देवाला दगडी दुधतूप॥
म्हणे विश्वंभर करील जे गाव। ना करील राव सरकार॥
शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरणार असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. मनुच्या पिलावळींनी शिक्षणाचा अधिकार नाकारला होता, पण आज प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार केवळ भारतीय राज्यघटनेने दिला आहे. प्रत्येक आई बापाची इच्छा असते की, आपल मुलं उच्च शिक्षित झालं पाहिजे, म्हणून ते दिवसरात्र एक करून पैसा जमवतात. मग तो जमवलेला पैसा शैक्षणिक संस्थेला फी च्या स्वरुपात देतात, इथपर्यंत ठिक आहे. पण त्यांनी जो कष्टाचा पैसा त्या शैक्षणिक संस्थेला दिला आहे ती संस्था त्या विद्यार्थ्यांला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास कटिबद्ध आहे का ?याचा विचार पालक करतात ना सरकार करते म्हणून तर आज गल्लोगल्ली शैक्षणिक संस्थांची दुकानदारी जोरात सुरू आहे. ह्या मांडलेल्या दुकानात असतं तरी काय ?नात्यातील अर्धशिक्षित कर्मचारी वर्ग, प्रवेश संख्या वाढवण्यासाठी ठेवलेले दलाल, जर संस्था राजकीय व्यक्तीची असेल तर मतदार संघातील राजकीय चेले संस्थेत कर्मचारी म्हणून वावरत असतात. त्यामुळे अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल अशी अपेक्षा करणे म्हणजे वांझोट्या गायीचं दुध काढण्यासारखे आहे. म्हणून तर ‘देशातील उच्च शिक्षण संस्थांची सामाजिक नाळ तुटत चालली असून भूछत्रांप्रमाणे हे शिक्षणाचे कारखाने पसरत चालले आहेत’, अशी टीका सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केली आहे ती आज तरी शंभर टक्के खरी आहे. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना ज्या शिक्षण संस्थेत प्रवेश करत आहोत त्या संस्थेचे अध्यक्ष व सचिव भैरवा https://youtu.be/zihfLLjYYRM तर नाहीत याची खात्री करावी. म्हणून तर पेरियार रामासामी म्हणतात की, तांत्रिक शिक्षणाच्या नावाखाली पैशाचा अपव्यय तर होतोच आहे परंतू त्यामुळे बौध्दीक दिवाळखोरीही वाढत आहे. तसेच तर विश्वंभर वराट म्हणतात की,
विद्यार्थी शिकेल त्याला शिकुद्या हो। शिकवता का हो तुम्ही त्याशी॥
शिकवाल तर पाठ्यक्रम त्याचा। त्यामाथी तुमचा लादू नका॥
येईल शाळेत हाताने मोकळा।पाठीवर खोळा पुरे झाल्या॥
भावी जगण्याची व्हावी कार्यशाळा। येतो कळवळा विश्वंभरा॥
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना आचार्य नागार्जून विद्यापीठाच्या वतीने डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली. तेव्हा या दीक्षांत समारंभात न्या. रमणा पुढे म्हणाले की, युवक हा सजगपणे बदल घडविणारा असला पाहिजे. त्यांनी शाश्वत विकासाच्या प्रारूपावर विचार केला पाहिजे. तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहून तुम्ही सजगपणे समाज आणि पर्यावरण यांच्या गरजांची दखल घेतली पाहिजे. देशातील उच्च शिक्षण संस्थांची सामाजिक नाळ तुटत चालली असून भूछत्रांप्रमाणे हे शिक्षणाचे कारखाने पसरत चालले आहेत. (लोकसत्ता २१ आॅगस्ट २०२२) न्या. एन. व्ही. रमणा यांचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे कारण बहुजन समाज सुशिक्षित व्हावा यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील हे होते. त्यांच्याच प्रतिमा अडकवून आजचे संस्थाचालक कोट्यावधींची माया जमवतात. दिमाखदार इमारती बांधून त्याची जाहीरातबाजी करून सर्वगुणसंपन्न असल्याचे देखावे पोस्टरच्या माध्यमातून चौका चौकात दाखवतात. पण प्रत्यक्षात त्या शिक्षण संंस्था किती खोल पाण्यात आहे हे तेथिल विद्यार्थीच सांगू शकतो. जेव्हा शाळा काॅलेज तपासणीसाठी कमिटी येणार असे पत्र महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांना मिळताच त्यांची जी भंबेरी उडते ती पाहाण्यालायक असते. पण ते जिथे काम करतात त्या संस्थेचे अध्यक्ष दाक्षिणात्य चित्रपटातील भैरवा असतात ? त्यामुळे ते आपल्या चेल्यांच्या सहकार्याने महाविद्यालयास भेट देण्यास येणा-या कमीटीस आवश्यक असणारी सर्व साधन सामुग्री दोन दिवसांच्या भाडेतत्वावर आणण्याचे काम करतात. मग त्या कमिटीच्या नियमानुसार संस्थेत पात्रताधारक उमेदवार उपलब्ध नसतात तेव्हा प्राचार्या मार्फत दोन दिवसासाठी भाड्याने पात्रताधारक शिक्षक उपलब्ध करून ते बाहुल्याप्रमाणे कमिटीच्या पुढे ठेवले जातात. महाविद्यालयाची इमारत ही कमीटीच्या नियमानुसार अपुरी असते, कारण सदरील एकाच इमारतीत अनेक प्रकारची दुकाने थाटली जातात. त्यामुळे जेव्हा एका महाविद्यालयाची कमिटी येणार असेल तेव्हा सर्व महाविद्यालयाच्या नावाने अडकवलेले नावाचे बॅनर लपवून महाविद्यालयाची इमारत पुरेशी आहे असे दाखवण्यात येते. म्हणून तर पेरियार रामासामी म्हणतात की, शिक्षण हे केवळ जगण्यासाठी काही कमविणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही’.तसेच विश्वंभर वराट म्हणतात की,
बंद पडू लागे सरकारी शाळा। सांग तुझ्या बाळा वाली कोण ॥
उच्चभ्रुंच्या घरी भरतील पाणी। आणि भाडिधुणी करतील॥
खाज लोकांसाठी असते खाजगी। तुम्ही किडामुंगी बराबर॥
म्हणे विश्वंभर ऐके रे बाप्पा। काढू नका झोपा आता तरी॥
वास्तव जीवनाला सामोरे जाताना येणारी आव्हाने कशी पेलावीत, हे शिकविणारी शिक्षण पद्धती विकसित केली पाहिजे, नवी शिक्षण पद्धती ही त्या विद्यार्थ्यांला समाजाचा जबाबदार घटक बनविण्याबरोबरच सामाजिक एकता साधणारी असली पाहिजे असेही सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले. (लोकसत्ता २१ आॅगस्ट २०२२) वास्तविकतेला सामोरे जाण्यासाठी ते आव्हान पेलण्याची धमक व उर्मी ही विद्यार्थी दशेतच निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थांना मार्गदर्शन द्यायला पाहीजे. पण आमचे आजचे शिक्षकच कोणतेही आव्हान पेलताना दिसत नाहीत. याच वास्तव म्हणजे विज्ञानाचे धडे देणारे अनेक मास्तर मंदीरातील मुर्त्या पुढे दंडवत घेताना अनेक गावकऱ्यांनी पाहीले आहेत. मास्तरच जर वास्तविकतेपुढे हतबल होत असेल तर ते काय आव्हानं पेलणारे विद्यार्थी घडवणार आहेत. म्हणून तर पेरियार रामासामी म्हणतात की, आजकाल शिक्षण हा एक उदात्त व्यवसाय आहे असे शिक्षकांना वाटते तरी सुद्धा त्यांना त्यांचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडता येणे शक्य झालेले नाही. प्रस्थापित शिक्षण पद्धतीमध्ये त्यांना त्यांच्या जबाबदा-यांची जाणीव होणे सुद्धा कठीण झाले आहे. म्हणून शिक्षकी पेशा हा सुद्धा निव्वळ अर्थार्जनापुरताच मर्यादित झाला आहे. शिक्षक अधिवेशने भरवतात आणि त्यामध्ये अधिक सोयी-सवलतीच्या आणि पगारवाढीच्या मागण्यांचे ठराव पास करतात’.अशा दैववादी शिक्षकासाठी खास विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्याच शब्दांत सांगावं वाटतं की,
कर्मकांडामध्ये गुंतले जरी का। शिक्षक शिक्षिका काय होते॥
एका कुटुंबाचे अहित ना होते। राष्ट्राची पावते अधोगती॥
ज्याच्या ना अंगी प्रयोगशीलता। त्याची बुद्धीमत्ता वांझ आहे॥
म्हणे विश्वंभर ते नरभक्षक । असे जे शिक्षक दैववादी ॥
आमच्या आजच्या शिक्षण संस्था चालकांना व तेथिल शिक्षकांना आपल्या जबाबदा-यांचे भान आणि ज्ञान राहीलेले सध्या तरी दिसत नाही. कारण शिक्षक वर्ग हा संघटीत असून तो जसा सातवा वेतन आयोग लागू करावा म्हणून ऐन परिक्षेच्या काळात सरकारला वेठीस धरतो तसे तो मुलांना योग्य मार्गदर्शन का करत नाही. कारण ५ सप्टेंबर हा राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा केला जाणारा शिक्षक दिन खोटा असताना तोच शिक्षकदिन आजचे शिक्षक का साजरा करतात ? विनायक दामोदर सावरकर हे इंग्रजांच्या पायावर लोळायचे मग ते वीर कसे ?तरीही आमचे शिक्षक त्यांचा स्वातंत्रवीर असा उल्लेख का म्हणून करत असतील ?आजच्या शिक्षकांना सांगावं वाटतं की, तुम्ही ज्याच्या नावाने शिक्षक दिन साजरा करत आहात त्यांच्या जन्मापुर्वी म्हणजेच ४० वर्ष आधी महात्मा जोतिबा फुलेंनी पहीली शाळा सुरू केली होती, मग तुम्हीच सांगा खरा शिक्षक दिन कोणाच्या नावाने साजरा केला पाहीजे ?हे सत्य सांगण्याची धमक आम‌च्या शिक्षकात आहे का ?जे सत्य सांगत किंवा स्विकारू शकत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात हाच मोठा प्रश्न आहे. म्हणून तर पेरियार रामासामी म्हणतात की, आजचे आपले शिक्षण हे ज्ञान संपन्न होण्याजोगे अथवा शहाणपण येण्याजोगेही नाही. आपण शिस्तबद्ध समाज निर्मिती करू शकत नाही हेही तेवढेच खरे. आज जे शिक्षण दिले जाते ते म्हणजे या जुलमी सरकारच्या संरक्षणासाठी शोधलेली युक्तीच आहे…. आपले शिक्षण आपल्या स्वाभिमानवृद्धीसाठी कूचकामी ठरले आहे ते केवळ सरकारच्या सेवेसाठी नवनवीन कामगार निर्माण करीत आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की, आपले शिक्षण म्हणजे देशद्रोही निर्माण करणारे यंत्रच आहे’.म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
माय माझ्या सावित्रीने सौभाग्याचे मोडले धन
अविद्येच्या विधवेला विद्येचे दिले सधवपण
मोरावरती बसली नाही चिखल फेकला रूसली नाही
सार्थ विद्येचे देवता ठरतात जोतिराव-सावित्रीमाई.
शेवटी बहुजन समाजाला सांगावं की, न्या. रमणा म्हणतात त्या भुछत्राप्रमाणे वाढणा-या शाळा महाविद्यालात आपल्या पाल्याचा प्रवेश करू नका. कारण ह्या दुकानाच्या चक्रव्यूहात एकदा का तुम्ही अडकलात तर तुम्हाला ते पिळून काढतील. त्यामुळे वेळीच सावध व्हा ! केवळ सावध होऊन चालणार नाही तर आपल्या पाल्याचा प्रवेश शासकीय शाळेत करून ह्या भुछत्रावर एकदाची लाथ मारून आपली लुट थांबवून पाल्याच भवितव्य घडवा, अन्यथा तुम्ही आणि तुमच मुलं बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *