प्रतिसरकारच्या तेजस्वी पर्वात जी.डी.बापू आघाडीवरचे योद्धे होते
——-प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

प्रतिसरकारच्या तेजस्वी पर्वात जी.डी.बापू आघाडीवरचे योद्धे होते<br>——-प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

प्रतिसरकारच्या तेजस्वी पर्वात जी.डी.बापू आघाडीवरचे योद्धे होते
——-प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

सातारा ता. ६ , ब्रिटिश साम्राज्यशाही प्रमाणेच एतद्देशीय गुन्हेगारी, दरोडेखोरी ,सावकारी, विघातक विकृती विरुद्ध लढण्यासाठी साताऱ्यात प्रतिसरकारची जून १९४३ मध्ये स्थापना झाली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात साताऱ्याचे
प्रतिसरकार हे एक तेजस्वी पर्व होते.त्या प्रतिसरकार मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी बापू लाड यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली.ते आघाडीवरील योद्धे होते. मध्यवर्ती युद्धमंडळ, न्यायदान मंडळ, लष्करी प्रशिक्षण केंद्र, जनता कोर्ट, तुफान दल,आघात दल, चवळीसाठी निधी उभारण्यासाठी खजिना लूट, दारूबंदी ते अस्पृश्यता निर्मूलन अशा अनेक माध्यमातून जी.डी.बापूंनी जे काम केलं ते आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही अतिशय महत्त्वाचे आहे,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात ‘ स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता समारंभ व व्याख्यान ‘ या कार्यक्रमात ‘ प्रतिसरकार व क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापूंचे योगदान ‘ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.अभयकुमार साळुंखे होते.यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या स्वातंत्र्य आंदोलनातील योगदानाचा उल्लेख करणारे मानपत्र कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.अभयकुमार साळुंखे यांच्या हस्तेआमदार अरुणअण्णा लाड यांना प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक व पाहुण्यांच्या परिचय प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ यांनी करून दिला.प्राचार्य डॉ.महेश गायकवाड यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी ऋतुजा खताळ या विद्यार्थिनीची एन.सी.सी.च्या राष्ट्रीय स्तरावरील थल सैनिक कॅम्प साठी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी मंचावर व्ही.वाय.आबा पाटील उपस्थित होते.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, अतिशय संघर्षशाली जीवन क्रांतीअग्रणी बापू जगले.एक धगधगता इतिहास त्यानी निर्माण केला.क्रांतीच्या मशालीने साम्राज्यवादी अंधार दूर करण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत अग्रणीपणे ते करत राहिले.देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची पर्वा न करता सहभागी झालेल्या बापूंची ‘महाराष्ट्राचे शिल्पकार ‘ या मालिकेतही आदराने नोंद घेतली जाते. सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने कशी धोरणे राबवली पाहिजेत याचे उदाहरण स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारच्या माध्यमातून ,स्वातंत्र्य आंदोलनातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात,शेती,पाणी,शिक्षण,सहकार, कष्टकरी, कामगार क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अफाट कार्यकर्तृत्वातून बापूंनी दाखवून दिले. आपल्या भाषणात प्रसाद कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य आंदोलन, प्रतिसरकार ,क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी. बापूंचे कार्य आणि वर्तमान काळात त्याचे महत्त्व याची सवित्तर व सखोल मांडणी केली.

आमदार अरुणअण्णा लाड सत्काराला उत्तर देतांना म्हणाले, विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे हेही स्वातंत्र्य सैनिक होते.तसेच ते जी.डी.बापूंचे मित्र होते.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा घेतलेला उपक्रम अभिनंदनीय आहे.प्रतिसरकारच्या काळामध्ये क्रांतीअग्रणी जी.डी. बापू लाड यांनी वयाच्या वीस ते पंचवीशीत जे काम केले ते अतिशय प्रेरणादायी स्वरूपाचे होते.तन-मन धन अर्पण करत प्रतिसरकार आणि ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी लढा प्राणाची पर्वा न करता ते आपल्या सहकाऱ्यांसहित कार्यरत राहिले.अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ती उर्मी आजच्या तरुणांनाही अंगीकारण्याची गरज आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.अभयकुमार साळुंखे म्हणाले, स्वातंत्र्य आंदोलनाचा व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा इतिहास अतिशय महत्वाचा आहे.नव्या पिढीला हा प्रेरणादायी वसा आणि वारसा सांगणे गरजेचे आहे.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांना आणखी पंचवीस वर्षांनी जेंव्हा स्वातंत्र्याची शताब्दी होईल तेंव्हाचा भारत सर्वार्थाने समृद्ध करण्यासाठी हा वारसा नव्या पिढीत रुजविण्याचे काम सर्वानी केले पाहिजे.आपल्याकडील बुद्धिमत्ता आपला देश विकसित करण्यासाठी प्राधान्याने वापरली पाहिजे.यावेळी प्रा.डॉ.भास्कर कदम, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांच्यासह अनेक मान्यवर, प्राध्यापक वृंद,विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.प्रा.डॉ.दीपक जाधव यांनी आभार मानले.प्रा.डॉ.विजया पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *