मानवाच्या प्रगतीची साक्षीदार दीक्षाभूमी- अमरकुमार तायडे
नागपूर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली नागवंशीयांच्या भूमीत कोटी-कोटी अस्पृश्यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. एक नवा ‘प्रकाशमार्ग’ दिला. शोषित, पीडित, वंचित तळागाळातील माणसाच्या वेदनांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वैचारिक संगराचे ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी आहे. म्हणूनच अशोक विजयादशमीच्या पर्वावर दीक्षाभूमीवर भीमसागराला उधाण येते.दरवर्षी धम्ममहोत्सव, सांस्कृतिक आयोजनातून बाबासाहेबांच्या क्रांतदर्शी विचारांचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा जल्लोष दीक्षाभूमीवर होतो. ही दीक्षाभूमी असंख्य लेखकांची कविता बनली आहे. साहित्यांतून बोलकी झाली. बौद्धच नव्हेतर समग्र मानवाच्या प्रगतीची साक्षीदार दीक्षाभूमी आहे.