मोदी रॉकेट तर फडणवीस बॉम्ब, दानवेंची पवारांना ‘ही’ उपमा, शिवसेनेवरही बोचरी टीका

जालना – दिवाळीचा सण आनंदाचा, उत्सवाचा आणि फटाके फोडण्याचा असतो. प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. गरीब झोपडीपासून ते श्रीमंताच्या बंगल्यातही या सणाचा अधिक असतो. अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरी करत प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व या सणाला आहे. सेलिब्रिटी, राजकारणीही दिवाळीच्या आनंदात राजकारण बाजूला ठेऊन हे क्षण साजरे करतात. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनीही आपल्या कुटुंबीयांसोबत गावाकडे दिवाळी साजरी केली. यावेळी, पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राजकीय फटाके फोडले. राजकीय नेत्यांना फटाक्यांची उमपा देत माळच लावली.  

रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर भाऊबीज निमित्ताने त्यांच्या बहिणीने दानवे यांना औक्षण करून भावांच्या दीर्घ आयुष्यासाठी व त्याला सुख, शांती आणि समृद्धीची भरभराट लाभो यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. याप्रसंगी पत्रकाराने दिवाळीचे फटाके आणि राजकारणी असं समीकरण जुळवत प्रश्न विचारला. त्यावेळी, रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवाळीच्या फटाक्यांमधील रॉकेट असून देवेंद्र फडणवीस हे अॅटम बॉम्ब असल्याचं म्हटलं. त्यासोबतच, इतरही राजकीय पक्षांना फटाक्यांची उपमा देताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे रॉकेट नेते असून, अॅटम बॉम्ब देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे रॉकेट आणि अॅटम बॉम्ब फक्त आमच्याजवळ  आहे. सध्या राजकारणात लवंगी फटाके खूप झाले आहेत, प्रत्येक पक्षात असे लवंगी फटाके आहेत. तर फटाक्यांची लड म्हणजे मनसे असून, एकदा फुटायला लागली की थांबतच नाही. या लडमधील फटाका फुटतो पण फायदा काही होत नाही. फक्त आवाज येतो, असे म्हणत मनसेचं कौतुक अन् टीकाही केली. तर आवाज देणारा खाकी फटका म्हणजे आपल्या राज्यात शरद पवार यांना म्हणता येईल. तसेच उध्दव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे फुसका फटका असल्याची बोचरी टीका दानवे यांनी केली. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही राजकीय पक्षांना फटाक्यांची उमपा दिली. 

अडीच वर्षात एकदाही आवाज नाही

अडीच वर्षात एकदाही आवाज केला नाही. आता आमचं सरकार आलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले. अडीच वर्षे या राज्याचे वाया गेले. त्यामुळे ज्या सरकारने राज्याच्या जनतेचे अडीच वर्षे वाया घातले त्यांना फुसका फटका म्हणता येईल असे दानवे म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *