येत्या वर्षभरात नदीकाठी सुर्यदेवाचे मंदिर उभारण्याची आमदार आवाडेंची ग्वाही
इचलकरंजी/प्रतिनिधी –
पुढील वर्षीच्या छठपुजेपर्यंत पंचगंगा नदीकाठावर सुर्यदेवाचे मंदिर उभारण्यात येईल, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी रविवारी येथे बोलताना दिली. रविवारी सायंकाळी मावळत्या सूर्याची विधीवत पद्धतीने पूजा करून उत्तर भारतीय बांधवांनी पंचगंगा नदीघाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभे राहून सूर्याला नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली. दरम्यान आज (सोमवार) पहाटे पंचगंगा नदीवर छठपूजेची सांगता होणार आहे.
छठ पूजा हा सूर्य देवाला समर्पित सण आहे, जो दिवाळीनंतर सात दिवसांनी साजरा केला जातो. हा देह आणि आत्मा शुद्धता, सत्य, अहिंसा, क्षमा आणि करुणा यांचा उत्सव आहे. कार्तिक महिन्यात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्येही हा सण साजरा केला जातो. यादिवशी सूर्यदेवाची पूजा नदी, तलाव किंवा तलावासारख्या जलकुंभात केली जाते, असे म्हणतात की छठ सणात सूर्याची उपासना केल्याने छठ मातेला आनंद मिळतो आणि कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते.
राजर्षि शाहु पूर्वोत्तर भारतीय संघाच्यावतीन येथील पंचगंगा नदी घाटावर रविवारी छठपुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी मोेठी गर्दी केली होती. नदीच्या पाण्यामध्ये उभे राहून व्रती सूर्याचे ध्यान करीत अर्ध्य दिले. यानिमित्त पंचगंगा नदीघाटावर ऊसाची पूजा उभारली होती. गहू, तूप, गूळ यांपासून तयार केलेला पदार्थांचा नैवेद्य व पूजेसाठी पाच फळे आणली होती. तर सोमवारी पहाटे उगवत्या सूर्याला अर्ध्य देऊन छठपुजेची सांगता होईल.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीतीरी पुजास्थळी भेट देऊन उत्तरभारतीयांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पुढील वर्षीच्या छठपुजेच्या पूर्वी पंचगंगा नदीतीरावर सुर्यदेवाचे मंदिर उभारण्यात येईल, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी माजी आमदार सुरेश हाळवणकर, भगतराम छाबडा, मदन कारंडे, प्रकाश दत्तवाडे, अरविंद शर्मा, विवेक पांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
Posted inBlog
येत्या वर्षभरात नदीकाठी सुर्यदेवाचे मंदिर उभारण्याची आमदार आवाडेंची ग्वाही
