शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘निश्चयाचा महामेरू ‘ पुस्तकाचे मातोश्रीवर प्रकाशन
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे, खा. विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मारुती साळुंके, आ. भास्कर जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लेखक योगेंद्र ठाकूर यांच्या लेखणीतून उद्धवजींच्या कार्यावर साकारलेले नव्या पुस्तकाचे प्रकाशन मातोश्रीवर झाले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर आणि एकंदर जीवनावर प्रकाश टाकणारे लेखन असलेले हे पुस्तकाचे शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या मातोश्री येथे खुद्द उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे लेखन प्रख्यात पत्रकार योगेंद्र ठाकूर आणि संपादन सहाय्य शिवसेना पदाधिकारी मारुती साळुंके यांनी केले आहे.
या पुस्तकात शिवसेनेच्या हिंदुत्व, मराठी बाणा, शेती, मुख्यमंत्री पदाचा काळ आणि सत्तातंर, उद्धव उवाच अशा विविध टप्प्यांवर माहिती दिली आहे.
दुसऱ्या भागात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लेख लिहिला आहे. यासह अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील उद्धव साहेबांवर लेख दिलेले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारे अनेक पैलू यामध्ये दिसत आहेत.
आमोद प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक आल्याने महाराष्ट्राच्या जनतेला मा. उद्धवजी ठाकरे यांचे आणखी काही पैलू समजणार आहेत. शिवसेना उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड यांच्यामते आपल्या नेत्यांच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा व हिंदुत्वाच्या पुरस्कार करणाऱ्या या पुस्तकाच्या प्रती प्रत्येक शाखेत व शिवसैनिकांपर्यंत पोहचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.