
प्रबोधिनीच्या ‘क्रांतिअग्रणी विशेषांकाचे ‘आमदार अरुणअण्णा लाड यांच्या हस्ते प्रकाशन
इचलकरंजी ता.१७ समाजवादी प्रबोधिनी गेली पंचेचाळीस वर्षे लोकप्रबोधनाचे कार्य अतिशय सातत्यपूर्ण पद्धतीने करीत आहे. प्रबोधिनीचे गेली तेहेतीस वर्षे नियमितपणाने सुरू असलेले ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ हे मासिक प्रबोधन व परिवर्तन चळवळीची एक सकस शिदोरी आहे. या मासिकाचा क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड जन्मशताब्दी विशेषांक प्रकाशित होतो आहे ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे .परिवर्तनवादी चळवळीशी बांधिलकी असलेल्या प्रत्येकाने हा अंक तर घ्यावाच शिवाय या मासिकाचे वर्गणीदार वाचक बनावे असे मत पुणे पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य आमदार अरुण अण्णा लाड यांनी व्यक्त केले. ते प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचा क्रांतिअग्रणी विशेषांकाचे प्रकाशन करताना बोलत होते. कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहामध्ये हा प्रकाशन समारंभ झाला.यावेळी या अंकाचे संपादक व समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी,ज्येष्ठ विचारवंत डॉ.बाबुराव गुरव,सांगली जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरदभाऊ लाड,भाई व्हीं. वाय.पाटील, कॉ.धनाजी गुरव,प्राचार्य डॉ.प्रकाश कुंभार , विजय मांडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड आणि समाजवादी प्रबोधिनी यांचा स्थापनेपासूनचा संबंध आहे .आचार्य शांताराम गरुड, प्रा.डॉ.एन. डी .पाटील, शहीद कॉ.गोविंद पानसरे यांच्यापासून माझ्यापर्यंत सर्वांशीच जीडी बापूंचा स्नेह होता. आजच्या अस्वस्थ वर्तमानामध्ये जी. डी .बापूंची विचारधारा पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे.. त्यासाठी या जन्मशताब्दीचे औचित्य साधून प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचा हा क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी.बापू लाड विशेषांक प्रकाशित करताना समाजवादी प्रबोधिनी परिवाराला मनस्वी आनंद होत आहे. तसेच जी. डी.बापूंना या अंकाद्वारे मानवंदना देता आली याचेही मोठे समाधान आहे.या १५६ पानी जोडअंकामध्ये आमदार अरुण अण्णा लाड,प्रा.डॉ.जे. एफ.पाटील, प्रा.डॉ.अवनीश पाटील ,दशरथ पारेकर , व्ही.वाय.पाटील, प्रसाद कुलकर्णी ,प्रा. डॉ.सुमित यादव,प्राचार्य डॉ.महेश गायकवाड,प्रा.डॉ.अशोक चौसाळकर,डॉ.अशोक ढवळे,प्राचार्य आनंद मेणसे ,संजीव चांदोरकर यांच्यासह डॉ.जी. डी.बापू लाड व भाई वैद्य यांचे लेख आहेत.तसेच जी. डी.बापूंचा जीवन परिचयही आहे.प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिक आता चौतीसाव्या वर्षात पदार्पण करत असून त्याचे वर्गणीदार वाचक होण्यासाठी समाजवादी प्रबोधिनी,५३६/१८ इंडस्ट्रीयल इस्टेट, इचलकरंजी -४१६ ११५ ता. हातकनंगले जी.कोल्हापूर ( ९८५०८ ३०२९० ) संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.