‘ मिर्झा गालिब ‘ यांना ‘ गझलसादचे ‘अभिवादन
कोल्हापूर ता.२७ गालिब या शब्दाचा अर्थच प्रभावी असा आहे. गझलेत गझलियत महत्वाची असते. मिर्झा गालिब यांच्या एकूण लेखनात गझलियतेबरोबरच मोठी ‘ गालिबियत ‘ दिसून येते.त्यामुळेच “है और भी दुनिया मे सुखनवर बहुत अच्छे, कहते है की गालिब का अंदाजे बयां और ”अर्थात या जगात गझला लिहीणारे अनेक जण आहेत पण असं म्हणतात की गालिबची विचार करण्याची आणि तो शब्दबद्ध पद्धत काही औरच आहे .”असे स्वतःविषयी आत्मविश्वासाने म्हणणाऱ्या मिर्झा गालिब यांनी आपल्या अनेक गझलांतून जीवनाबद्दलचा गंभीर दृष्टिकोन, एक तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला ,त्याचे सार्वकालिक महत्त्व मोठे आहे ,असे मत गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते गझलसाद संस्थेच्या वतीने मिर्झा गालिब यांच्या दोनशे पंचविसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी रसिकाग्रणी सुभाष नागेशकर आणि चित्रकार संजय शेलार यांच्या हस्ते मिर्झा गालिब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात”ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता,अगर और जीते रहते यही इंतजार होता” ही बेगम अख्तर यांनी गायलेली गझल ऐकून करण्यात आली.यावेळी झालेल्या मुशायऱ्यात प्रा.नरहर कुलकर्णी, हेमंत डांगे,प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार,सारिका पाटील,युवराज यादव यांनी गझला सादर केल्या.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले,त्या कालावधीत मोगल साम्राज्य मोडकळीला आले होते. दिल्लीत शायरीला बहर आला होता. खुद्द बादशहा बहादूरशहा जफर मोठे शायर होते. गालिबपूर्वकाळातील उर्दू शायरी ही पारंपारिक शृंगारीक शायरी होती.ती फारसीचे अनुकरण करत होती.पण गालिब यांच्या अलौकिक प्रतिभेने आणि कल्पनाविलासाने उर्दू गझलेचा चेहरामोहरा आणि संपूर्ण बाज बदलला.त्या शायरीची उंची वाढली.ती समकालीन सामाजिक प्रश्नांना भिडली प्रसाद कुलकर्णी यांनी गालिब यांचे जीवन,लेखन,तत्वज्ञान याची मांडणी केली.
प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार म्हणाले, मिर्झा गालिब हे माणुसकीने ओतप्रोत भरलेले मानवतावादी शायर होते.सहनशीलता आणि क्षमाशीलता ही त्यांच्या व्यक्तित्वाची वैशिष्टे त्यांच्या गझलेतून उमटलेली आहेत.गालिब यांची शायरी खऱ्या अर्थाने फैज अहमद फैज यांनी पुढे नेली.प्राचार्य कुंभार यांनी फारसी उर्दुतील फरक,गालिब यांचे अनेक शेर, त्यांचे चाहते,त्यांची भूमिका आपल्या मांडणीतून स्पष्ट केली.
दुसऱ्या सत्रात मुशायऱ्याची सुरुवात,प्रा.नरहर कुलकर्णी यांनी,’पहात असतो, ऐकत असतो, वाचत असतो,समजुन सारा भोवताल मत बनवत असतो ,तुझे नि माझे गुपीत आता जगास सांगू, तुला वाचण्या रोजच मी ही जागत असतो ‘ या सुंदर गझलेने केली.सारिका पाटील यांनी,’करून झाले सगळे एकच करणे बाकी आहे,जीवनामधे आता केवळ जगणे बाकी आहे…सत्य अढळ हे आहे आणिक तितके शाश्वतसुद्धा,आटत नाही झरा जोवरी झरणे बाकी आहे ‘ या सुरेख गझलेतून मैफलीत रंग भरला. हेमंत डांगे यांनी, हमेशा मुझे यही एहसास है ,कि वो ही हमेशा मेरे पास है ‘ तसेच ‘रस्त्याने मिरवत मिरवत हा कोण चालला होता? जगताना दिसला नव्हता मेल्यावर सजला होता’अशी भावना आपल्या उर्दू व मराठी गझलेतून व्यक्त केली.
प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी ‘ पाखरांना शोधताना पारध्यांचा माळ आला,हात माझे बांधलेले अर्भकांचा काळ आला, झाकुनी पोटात येती हात त्यांचे रंगलेले, विठ्ठलाच्या दारी म्हणती आज आम्हा माळ घाला ‘ असा सामाजिक उद्गार काढला.युवराज यादव यांनी,’ सोसता चटके उन्हाचे हात माझे पोळून गेले ,मागचे ते सूर्य सारे मन हे माझे जाळून गेले, कधी कळावे भोळ्या मनाला क्षणिक ही सावली सुखाची , परी मृगजळाच्या आभासाने हे मन भोळे भाजून गेले ‘ अशी वेदनभावना मांडणारी गझल सादर केली.प्रसाद कुलकर्णी यांनी,’हृदये जोडत प्रेम घराशी होऊ शकते,माझे घरही मदिना – काशी होऊ शकते,जमिनीवरती पडता पडता थेंब म्हणाला, माझी मैत्री पुन्हा नभाशी होऊ शकते..या गझलेतून संभाव्यता सादर केली. मिर्झा गालिब यांना आदरांजली वाहणारा हा गझलसादचा हा कार्यक्रम अतिशय उत्तमपणे संपन्न झाला.

