प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालघर जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल
-जिल्हाधिकारी गोविंद बोडके

पालघर दि. 26 : विविध शासकीय योजना गरजू लाभार्थींपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. विकासाची अनेक कामे पुर्ण होऊन नागरीकांचे जिवनमान सुखकर झाले असून जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी श्री. बोडके बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, पालघर नगर परिषदेच्या अध्यक्षा उज्वला काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजिव जाधवर तसेच पत्रकार, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व नागरीक उपस्थित होते.
दि. 15 नोव्हेंबर 2023 रोजी देशातील 108 आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ करण्यात आला असून सदर विकसित भारत संकल्प यात्रेची पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व नागरी भागात दिनांक 15 नोव्हेंबर पासून ते दिनांक 26 जानेवारी 2024 पर्यंत वाटचाल सुरू आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान; हर घर जल (जल जीवन मिशन) जन धन योजना, अटल पेन्शन योजना, नॅनो फर्टिलायझर्स योजना आदी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे.
वनहक्क कायद्यान्वये वैयक्तिक व सामुहिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आलेले आहेत. जवळपास 30 हजार हेक्टर पेक्षा जास्त जमिनीचा मालकीहक्क आदिवासी बांधवांना देण्यात आलेला असून राज्यामध्ये पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 97 हजार 926 लाभार्थी पात्र झालेले आहेत. सदर लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ तसेच राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा लाभ मिळणार आहे.कामगार विभागामार्फत विटभट्टी व मनरेगा कामगार तसेच इतर बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आलेली असून त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यात येतात. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून जव्हार व डहाणू अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेमध्ये शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. जव्हार व डहाणू प्रकल्पाअंतर्गत आजतागायत 45 शासकीय आश्रमशाळांमध्ये CSR निधीमधून शालेय इमारतीची दुरूस्ती व रंगकाम करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून 55 शाळांमध्ये 151 वॉटर हीटर बसविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यात जिल्हामध्ये सुमारे 125 कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याव्यतिरिक्त उल्लास नवभारत साक्षर कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याकरिता पालघर जिल्ह्यातील एकूण 39 हजार 912 एवढे असाक्षर उद्दिष्ट लक्षात घेऊन साक्षरतेचे कामकाज पूर्ण करावयाच्या दृष्टीने स्वयंसेवी पध्दतीने समाजातील साक्षरांनी असाक्षरांना साक्षर करण्याची जबाबदारी स्वयंसेवक म्हणून सर्वांनी स्विकारावी असे आवाहन श्री. बोडके यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार महानाट्यद्वारे राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महानाट्याचे आयोजन करण्यात आलेले असून पालघर येथे दिनांक 8 ते 10 मार्च 2024 यादरम्यान सदर महानाट्याचे सादरीकरण संपन्न होणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पालघर जिल्ह्यामध्ये या महोत्सवाचे दिनांक 7 फेब्रुवारी ते दिनांक 11 फेब्रुवारी 2024 यादरम्यान सादरीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बोडके यांनी केले.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *