अनिल बाबर यांच्या निधनाने समाजकार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अनिल बाबर यांच्या निधनाने समाजकार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

मुंबई दि. ३१: आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी आणि सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते.

बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर -आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे, असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *