स
क
निर्भय बनो टीमवर भ्याड हल्ला करणाऱ्या फॅसिस्ट गुंडांचा जाहीर धिक्कार.
सरकारने कठोर कायदेशीर कारवाई करावी – समाजवादी पार्टी, महाराष्ट्र
मुंबई दि. १० – “काल शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुणे येथे साने गुरुजी स्मारक भवन येथील जाहीर सभेसाठी जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, एड. असीम सरोदे या निर्भय बनो टीमवर फॅसिस्ट प्रवृत्तीच्या व अतिरेकी विकृत मनोवृत्तीच्या जातीयवादी गुंडांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये केवळ या तिघांवरच नाही तर उपस्थित महिलांच्यावरही लाजिरवाणे हल्ले करण्यात आले. या सर्व प्रकरणामध्ये आधीच्या घटना पाहिल्या तर स्थानिक भाजपा नेत्यांनी स्पष्टपणे ‘ही सभा होऊ देणार नाही, परवानगी दिली तर उधळली जाईल’ असा जाहीर इशारा दिला होता. तरीही पुण्यातील पोलिसांनी सर्व माहिती असतानाही बघ्याची भूमिका घेतली आणि हा हल्ला होईपर्यंत मूक पाठिंबा देऊन तमाशा पहात उभे राहिले. निर्भय पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि त्यासाठी पत्रकारांना संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. असे असतानाही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचा लोकशाही व संविधान विरोधी भ्याड हल्ला हा महाराष्ट्राला कलंक आहे. यामागील शक्ती आणि प्रवृत्ती स्पष्ट आहेत व सीसीटीव्ही फूटेज मध्ये कैद आहेत. या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी” अशी मागणी समाजवादी पार्टी महाराष्ट्र पक्षाच्या वतीने अध्यक्ष अबू आसिम आझमी, कार्याध्यक्ष प्रताप होगाडे, आ. रईस शेख, प्रधान महासचिव परवेझ सिद्दिकी, प्रवक्ता एड. रेवण भोसले, उपाध्यक्ष डॉ. पी डी जोशी पाटोदेकर, मुंबई प्रधान महासचिव मेराज सिद्दीकी आदि प्रमुख नेत्यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचा सुधारणावादी महाराष्ट्र आता गुंडाराज महाराष्ट्र होऊ लागला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये राजकीय स्वरूपाच्या पाच गोळीबार घटना घडलेल्या आहेत. पुण्यातील निर्भय बनो टीमच्या सभेला विरोध हे संविधान विरोधी विकृत मानसिकता, लोकशाही मूल्यांचा अभाव आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांची गळचेपी याचे ज्वलंत उदाहरण आहे. विचारांचा मुकाबला विचारांनीच केला पाहिजे ही लोकशाहीमधील मूलभूत जबाबदारी ज्यांना मान्य नाही आणि जे मुलतः फॅसिस्ट आहेत, फॅसिझमचा पुरस्कार करीत आहेत, आणि ज्यांना या देशांमध्ये कोणताही विरोधी विचार जाहीरपणे मांडलेलाही सहन होत नाही अशा प्रवृत्तींनी हा प्रकार हेतूपुरस्सर घडवलेला आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणून जनतेमध्ये एक उन्माद निर्माण करण्याचा हा शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. इ.स. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली, त्यावेळी लोकनायक जयप्रकाश नारायण यांची प्रतिक्रिया होती – विनाशकाले विपरीत बुद्धी. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या सर्व व्यक्ती, सर्व संघटना यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि जनतेचे सर्व लोकशाही हक्क अबाधित राहिले पाहिजेत ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. ती सरकारने पार पाडावी. अन्यथा “जनता आई है, सिंहासन खाली करो” ही वेळ पुन्हा येते आहे, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे. कार्यकर्त्यांनी अशा फॅसिस्ट प्रवृत्तींचा ठामपणे जाहीर मुकाबला सर्वत्र जाहीर निषेध, निदर्शने, मोर्चे, धरणे इत्यादी शांततापूर्ण आंदोलनाच्या मार्गानी करावा असेही आवाहन समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
क