इचलकरंजी : येथील लाखेनगर परिसरात असलेल्या सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीइटीपी) प्रकल्पातून सोडले जात असलेले सांडपाणी व स्लज यांच्या दुर्गंधीमुळे भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या संदर्भात योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी माणुसकी फौंडेशनच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करत दुर्गंधी बंद न झाल्यास प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला.
लाखेनगर परिसरात तत्कालीन नगरपालिकेच्या वतीने सांडपाण्यावर प्रक्रिया कारण्यासाठी सिइटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी प्रक्रिया केल्यानंतरच सांडपाणी काळ्या ओढ्यात सोडले जाते. परंतु येथील कामाबद्दल सतत तक्रारी येतात. प्रक्रिया केल्यानंतर सोडण्यात येत असलेल्या पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असून त्याचा त्रास जाधव मळ्यासह परिसरातील नागरिकांना होत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करुनही काहीच कार्यवाही होत नसल्याने शुक्रवारी माणुसकी फौंडेशनचे रवि जावळे यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिकांनी महानगर पालिकेवर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली.
यावेळी शिष्टमंडळाने उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांची भेट घेत निवेदन देत परिस्थितीची माहिती दिली. विनाप्रक्रिया सोडले जाणारे सांडपाणी तसेच मैलामिश्रित पाण्यामुळे भागातील नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. शिवाय मशीनरीच्या आवाजाचाही त्रास होत आहे. या संदर्भात प्रशासनाने संबंधिताना सूचना देऊन सुधारणा करुन दुर्गंधी कमी करण्याच्या सूचना द्यावेत अन्यथा कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच हा प्रकार न थांबल्यास प्रकल्पाचे काम बंद पाडण्या चा इशारा दिला.