पत्रकार ते शिक्षक आमदार कपिल पाटील आदर्श व्यक्तीमत्व !

पत्रकार ते शिक्षक आमदार कपिल पाटील आदर्श   व्यक्तीमत्व !

(आमदार कपिल पाटील याची विधान परिषदेतील अठरा वर्षे पूर्ण व सभागृहातून निवृत्ती की स्वल्पविराम ! यावर राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी टाकलेला प्रकाश)

सन्माननीय शिक्षक आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील यांना उदय नरे यांचा सस्नेह नमस्कार! शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा संबंध माझा कॉलेज जीवनामध्ये आला. गोरेगाव येथे पाटकर महाविद्यालयामध्ये शिकत असताना छात्र भारती या संघटने मध्ये कार्यरत होतो. आमच्या कॉलेजच्या बाजूलाच स्वर्गीय मृणालताई गोरे यांचे कार्यालय होते. विद्यार्थी संघटनेच्या विविध आंदोलनात त्या काळात मृणालताई गोरे यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन असायचे. विद्यार्थी आंदोलनात एक गोरा, घाऱ्या डोळ्याचा युवक अत्यंत जोशपुर्ण आवर्विभावात आपले विचार सुसंस्कृत व परखडपणे मांडत असे आणि अत्यंत तन्मयतेने काम करणारा तो युवा नेता म्हणजे कपिल पाटील. छात्र भारतीची विद्यार्थी आंदोलन ही त्या काळात अत्यंत गाजली. आगळ्यावेगळ्या अहिंसक मार्गाने आंदोलन करणे हे कपिल पाटील यांचे वैशिष्ट्य. छात्र भारती या संघटनेचे वसई किल्ल्यामध्ये एक संम्मेलन आयोजित केले होते त्यावेळी मी त्यांना भेटलो रात्र शाळेसाठी काढलेला बॅटरी मोर्चा आजही माझ्या लक्षात आहे. सदानंद बंदरकर, त्यावेळेचे विद्या विकास शाळेचे शिक्षक जोगेश्वरीतील जनता दलाचे नगरसेवक मोहन कांदळगावकर यांच्या संपर्कात असल्याने कपिल पाटील यांच्या जवळ मी आलो. कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखाली सुध्दा कपिल पाटील यांनी आंदोलन केल्याचे मला आठवते.

कॅपिटेशन फी विरोधी कायद्यासाठीचं आंदोलन असो, बीएड, डीटीएड विद्यार्थ्यांचं आंदोलन असो, सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठीचं आयोजन असो प्रत्येक लढ्यात ते पुढे होते.
महिला शिक्षकांना प्रसूती रजा, शिक्षकांना एक तारखेला पगार, संच मान्यता, शिक्षक सेवक पगार वाढ. केजी’ ते ‘पीजी’पर्यंतचे शिक्षण मोफत करा, वस्तीशाळा शिक्षकांना कायम करा, शाळा आणि कॉलेजांना वीज आणि प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत द्या, असे कितीतरी अगणित विषय आमदार कपिल पाटील यांनी यशस्वीपणे हाताळले.
शिक्षणाच्या हक्कासाठी – शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्ञानज्योती फातिमा शेख यांचा आदर्श मानून गेली अनेक वर्षे शिक्षकांसाठी लढणाऱ्या कपिल पाटील यांना सभागृहात गौरविण्यात आले. ं
आमदार कपिल पाटील यांनी शिक्षक आमदार म्हणून काम करण्यापूर्वी पत्रकार क्षेत्रात चांगलेच नाव कमावले होते. शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली होती व अज्ञातवासात असताना त्यांच्या संपर्कात असलेला सांज दैनिकाचा एकमेव पत्रकार म्हणजे कपिल पाटील. निखिल वागळे संपादक होते व कपिल पाटील हे मुख्य वार्ताहर. महानगर सांज दैनिक त्यावेळी मुंबईमध्ये फार जोमाने चालत होते.आजच्या सारख्या वृत्त वाहिन्यां त्याकाळी नव्हत्या. महानगर सांज दैनिक शिवसेनेला कधी ” टार्गेट” करायचे तर कधी शिवसेना आपल्या स्टाईलने महानगर सांज दैनिकाला टार्गेट करायचे.हा “सामना” पत्रकारांनी अनुभवला. पत्रकार कपिल पाटील “सत्तेचे मोहरे” नावाचे एक सदर चालवत. सखोल लेखन हा त्यांचा हातखंडा. दादरमध्ये एक मराठी दिग्गज नेते राहत होते या नेत्याच्या घराजवळ महानगर याचे कार्यालय होते आणि असे असताना स्वतःच्या लेखणीवरती मर्यादा न ठेवता त्यांनी अत्यंत कठोरपणे सत्य परिस्थिती आपल्या वर्तमानपत्रातून मांडत होते यामुळे त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला त्यांचे संपादक निखिल वागळे यांच्यावर आणि कपिल पाटील यांच्यावरही हल्ला झाला होता. पेपरची होळी करण्यात आली होती. माझ्या माहितीप्रमाणे कपिल पाटील यांना पोलिसांची सुरक्षा पुरवली होती. परंतु आपल्या लेखनात त्यांनी कधीही खंड पाडला नाही. निर्भयपणे आपली लेखणी चालू ठेवली होती. काही काळानंतर दादर येथील कार्यालय माहीम येथे हलविण्यात आले. महानगरची सांज दैनिकाची धुरा निखील वागळे, कपिल पाटील, युवराज मोहिते यशस्वीपणे सांभाळत होते. वैयक्तिक स्पर्धा किंवा इतर कारणामुळे आमदार कपिल पाटील निखिल वागळे यांच्या महानगर पासून विभक्त झाले. मैत्री आजही कायम आहे. त्यांनी दादर येथे ” आज दिनांक” हे सांज दिनांक सुरू केले आज दिनांक या वर्तमानपत्राची संपादकाची धुरा ते यशस्वीरित सांभाळत होते निर्भीड लेखनामुळे आज दिनांकला लवकरच गाशा गुंडाळावा लागला. तडजोड करणे हे जमले नाही. कोणतेही वर्तमानपत्र आर्थिक दृष्ट्या सक्षमपणे चालवणे हे फार कठीण काम आहे, हे आपण सर्वांना ज्ञात आहे. परंतु कोणत्याही प्रकारची भायभीड न ठेवता कोणत्याही प्रकारची तडजोडी न स्वीकारल्या मुळे आज दिनांक आर्थिक गणित न जमल्यामुळे बंद करावे लागले. पत्रकार क्षेत्रात त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेले अनेक पत्रकार त्यांनी तयार केले. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी राजकारणात कधी तडजोड केली नाही तीन वेळा मुंबई शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. संजीवनी रायकर या शिक्षक मतदारसंघाच्या तत्कालीन आमदार होत्या.मुंबईमध्ये त्यांच्याशिवाय त्यांच्या संघटने शिवाय कोणी शिक्षक आमदार होऊ शकत नाही अशी एक संकल्पना निर्माण झाली होती. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे वारे वाहू लागले. यापुर्वी कोकण मतदारसंघात कपिल पाटील यांनी प्रयत्न केला होता पण यश आले नाही. न खेचता अशोक बेलसरे सर , शरद कदम, अरुण लावंड, राजु बंडगर, जगन्नाथ जाधव,शशीकांत उतेकर, सदानंद बंदरकर , सुभाष मोरे जालिंदर सरोदे चंद्रकांत म्हात्रे. रोहित ढाले, सचीन बनसोडे, नारायण वाघ वसईतील अनेक कार्यकर्ते नवनाथ गेंड, जयवंत पाटील, संगीता पाटील, कल्पना शेंडे, नेहा आंबेकर,सुचिता पाटील अशां सारख्या कितीतरी कार्यकर्त्यांची फळी उभारून अनेक चांगले कार्यकर्ते निर्माण केले. आता काही कार्यकर्ते नेतेही झाले.
कपिल हरिश्चंद्र पाटील हे भारतीय राजकारणी मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि जून 2006 ते जुलै 2024 या काळात ते लोकभारती या राजकीय पक्षाचे संस्थापक होते. 2017 मध्ये, लोक भारती जनता दल (युनायटेड) मध्ये विलीन झाली . मात्र जेडीयूमध्ये फूट पडली तेव्हा ते शरद यादव यांच्या पाठीशी उभे राहिले होते . 2018 च्या विधान परिषद निवडणुकीसाठी, त्यांनी लोक भारतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आणि विजयी झाला. सर्व विरोधी उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली होती व आपली एक आगळी वेगळी छाप निर्माण केली. पक्ष संघटना मजबूत केली वाढवली. केवळ शिक्षक मतदार संघात बंदिस्त राहता पदवीधर मतदारसंघात, विधान सभा व नगरसेवक पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. उल्हासनगर महापालिकेत तर कपिल पाटील यांनी चमत्कार करून दाखवला व आपली राजकीय शक्ती महाराष्ट्राला दाखवून दिली. नितीशकुमार यांच्या समवेत त्यांनी महाराष्ट्रात महायुती मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु बिहार राज्यातील राजकारण बदलले. नितीशकुमार यांनी पुनश्च मोदी सरकार बरोबर घरोबा केला. परंतु कपिल पाटील यांनी महायुतीतील आपली साथ सोडली नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कपिल पाटील यांना महायुतीच्या बैठकीत आमंत्रण दिले. त्यांच्यावर विश्वास टाकला. कपिल पाटील यांनी महायुती महाराष्ट्रात भक्कम करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्या समवेतच राहण्याचा निर्णय घेतला.
कपिल पाटील यांनी 26 जून 2006 रोजी पहिल्यांदा मुंबई शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर मुंबई शिक्षक भारतीची झाली. भारतीय जनता पक्षाचे त्यावेळचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी कपिल पाटील यांचे विशेष अभिनंदन केले होते. “आमच्या कडून आमची जागा बळकावणारा तू “असे गौरवोद्गार काढून कौतुकाची थाप दिली होती. स्वर्गीय मुख्यमंत्री काँग्रेस नेते विलासराव देशमुख व कपिल पाटील यांचा विशेष सख्य . काही पत्रकार तर विलासरावांच्या काळात कपिलला काँग्रेसचे पिल्लू म्हणायचे. पण एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु लिमये आणि राम मनोहर लोहिया यांच्या विचाराचा प्रभाव, समाजवादी विचारांवर त्यांची प्रचंड निष्ठा आहे . म्हणूनच कोणत्याही प्रलोभनाला ते बळी पडता त्यांनी आपली राजकीय वाटचाल पुढे चालू ठेवली.
मंत्रिपद मिळावं म्हणून प्रयत्न केले नाहीत. नितिश कुमार यांनी यापूर्वी सुध्दा भाजपचा घरोबा केला होता त्यावेळेस जर कपिल पाटील भारतीय जनता पार्टीत गेले असते तर शिक्षण मंत्री सुध्दा झाले असते पण त्यांनी तत्त्वांशी तडजोड केली नाही. आमदारांच्या राजयोग सोसायटीत मिळालेलं घरही त्यांनी नाकारलं होतं. अंधेरी सारख्या मोक्याच्या ठिकाणी मंजूर झालेले घर नाकारणारा एकमेव आमदार कपिल पाटील कारण त्यांच्या समोर आदर्श होता समाजवादी नेत्यांचा. त्यांनी अलिशान घर नाकारल्यानंतर ज्येष्ठ मंत्र्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना फोन केला. कपिल पाटील यांना घर घेण्यास सांगण्याची विनंती करायला सांगितलं. त्यावर ‘अरे तो समाजवादी आहे. त्याला नका सांगू घर घ्यायला. तो ऐकणार नाही,’ असं खुद्द विलासराव म्हणाले. खरंतर विलासरावांनी दिलेलं हे त्यांच्या प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेटच होतं. मुख्यमंत्री म्हणून विलासराव पायउतार झाल्यावर शिक्षक भारतीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विलासरावांना आमंत्रित केले होते कारण सत्तेपुढे लाचार होणारा कपिल नव्हता. शिक्षक भारतीच्या कार्यक्रमात मंचावर मोहन वाघ होते. एका कार्यक्रमात हितेंद्र ठाकूर, राजू शेट्टी होते. तर स्नेहसंमेलनात आशिष शेलार उपस्थीत होते अनेक राजकीय पक्षातील नेत्यांशी कपिल पाटील यांचा स्नेहसंबंध आहे यामुळेच की काय आज हिंदूत्ववादी नेते उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत कपिल पाटील यांनी मोट बांधली आहे. मला चांगले आठवते माझी पहिली बातमी कोणी छापली असेल तर ती महानगर या सांज दैनिकात कपिल पाटील यांनी. बातमीचे शिर्षक होते हिंदुत्वापेक्षा मानवता श्रेष्ठ – दिलीपकुमार. कपिल पाटील दिलिप कुमार यांचा चाहता. दिलिप कुमार काँग्रेसचे स्टार प्रचारक. असा हा समाजवादी नेता विधान परिषदेत तुटून पडत असे. तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे व कपिल पाटील यांचा संघर्ष लाजवाब असायचा पण तो सभागृहापुरताच. माझ्या माहितीप्रमाणे कपिलला पुजापाठ, कर्मकांड यावर अजिबात विश्वास नाही यामुळे काही धार्मिक शिक्षक त्यांच्या विरोधात होते. संघटना जसजशी वाढत जाते तसतशी त्याला फाटे फुटतात. तसेच कपिल पाटील यांच्या बाबतीतही झाले. अनेक कार्यकर्ते दुखावले गेले. काहींनी वेगळा मार्ग धरला परंतु कपिल पाटील यांनी त्यांची मने जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या विरोधात कधी बोलला नाही पण समजून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. कपिल पाटील यांनी विधान परिषदेतील कारकीर्द यशस्वीपणे पुर्ण करून विधान परिषदेतून निवृत्त झाला आहे. राजकारणातून नव्हे! काय सांगावे भविष्यात उद्या कधीतरी उध्दव बाळासाहेब ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशाने कपिल आपणास परत कधी विधान परिषदेत किंवा राज्यसभेत सर्व सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढताना दिसेल. तुर्तास कपिलच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *