संतांनी कर्मकांड नाही तर कर्मयोग सांगितला -प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

संतांनी कर्मकांड नाही तर कर्मयोग सांगितला -प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

संतांनी कर्मकांड नाही तर कर्मयोग सांगितला

प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

कुंडल ता. ५’अनुसयाची लोकगीते आणि भक्तीगीते ‘हे पुस्तक संत साहित्य आणि लोकसाहित्याची विचारधारा पुढे नेणारे आहे. त्यातील शब्दाशब्दातून मानवता प्रगट होते .ज्याची वर्तमान काळात फार मोठी गरज आहे. मराठी संतांनी चमत्काराशिवाय महाराष्ट्राला जागे केले.चमत्कार पसरवण्यामागे डोळस पुनरुज्जीवनवाद असतो. संत साहित्य हे जागतिक साहित्याचे अलौकिक लेणे आहे संतांनी पारमार्थिक लोकशाही स्थापन केली.संतांची भक्तीरसाची भूमिका आणि मानवता फार महत्त्वाची होती. शेत नांगरतानाही भक्ती करता येते व मोक्ष मिळवता येतो. भक्ती मार्गात श्रद्धा आणि भावना महत्त्वाची असते. त्यात कर्मकांडाला कोणतेही महत्त्व नसते.पण आज कर्मकांडच तेजित आहे. प्रार्थनेपेक्षा महाप्रसादाचे महत्त्व वाढणे योग्य नाही. म्हणूनच या लोकगीत आणि भक्ती गीताच्या पुस्तकातून मांडेला विचार पुढे नेणे गरजेचे आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते कुंडल येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्या वतीने आयोजित केलेल्या उपेक्षित बहिणाबाई ह. भ. प. कालवश अनुसया बाबुराव लाड यांची ‘अनुसयाची लोकगीते व भक्ती गीते ‘या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी क्रांती उद्योग समूहाचे नेते व पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुणअण्णा लाड होते. स्वागत व प्रस्ताविक स्वागताध्यक्ष व मामासाहेब साहेब पवार सत्यविजय को ऑप बँकेचे चेअरमन प्रकाशराव ऊर्फ बाळासाहेब पवार यांनी केले. पुस्तकाचे लेखक व संकलक महादेव बाबुराव लाड यांनी या ग्रंथांमागील भूमिका सांगितली. व्हीं.वाय.आबा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मंचावर सरपंच जयवंत होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार, माजी सरपंच प्रमिला पुजारी, सर्जेराव पवार, श्रीकांत लाड, रामभाऊ सावंत, दीपक लाड, नामदेव सोळवंडे ,सुदाम जाधव ,मुकुंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रंथाचे मुद्रक गोविंद यांचा सत्कार करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, संतांनी स्वतःच्या कुचंबणेतून समाजाची कुचुंबणा पाहिली. आपल्या लेखणीला, आचरणाला बंडखोरीचे रूप दिले .ही बंडखोरी म्हणजेच त्यांच्या अंतकरणातून आलेला तळागाळातील जनतेबद्दलचा कळवळा होता. आपण संतांचे दैवतीकरण करून त्यांचे माणूसपण नाकारणे योग्य नाही. संत हे सर्वसामान्यांचे खरे खुरे लोकप्रतिनिधी होते .त्यांनी लोकभाषा वापरली. धर्म सुधारण्याची चळवळ हेच धर्मकार्य आहे हे ज्ञानेश्वरांनी सांगितले .हा धर्म माणुसकीचा आहे . दुरीतांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो असे पसायदान मागितले. दया ,क्षमा ,शांती हाच धर्म आणि मानवता आहे. जातीभेद वर्णभेद प्रत्यक्ष विठ्ठलाला ही मान्य नाही. तो फक्त शुद्धचित्त पाहतो.हे सर्व संतांनी सांगितले. ‘कोण तो सोवळा कोण होतो ओवळा ,दोन्हीच्या वेगळा विठू माझा ‘ किंवा तुकाराम महाराज म्हणतात ‘ अवघी एकाचीच विण तेथे कैसे भिन्न भिन्न ‘हे आपण समजून घेतले पाहिजे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संतसाहित्य, लोकसाहित्याच्या विचारधारेचा आढावा घेतला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, ‘ज्ञानदेवे रचिला पाया,तुका झालासे कळस’ या संत परंपरेने जातभेद विरहित, अंधश्रद्धा विरहित, समतावादी शिकवण दिली. संतांच्या शिकवणीचा अंगीकार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. या पुस्तकामधून मानवतेचा विचारजागर होतो आहे. समाजाला वैचारिक अधिष्ठान देण्यासाठी संतसाहित्य आणि त्याचे दाखले देणारे लेखन अतिशय महत्त्वाचे आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास कुंडल आणि परिसरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदेव क्षीरसागर यांनी आभार मानले.श्रीकांत माने आणि शिवाजी वागळे यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *