बांबू, टसर रेशीम शेतीमुळे पूरक रोजगाराची मोठी संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

बांबू, टसर रेशीम शेतीमुळे पूरक रोजगाराची मोठी संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ
महासंवाद

 

बांबू, टसर रेशीम शेतीमुळे पूरक रोजगाराची मोठी संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि.९: मौजे दरे (ता. महाबळेश्वर) येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. बांबू, टसर रेशीममुळे पूरक रोजगाराची मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दरे येथे झालेल्या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दरे तर्फ तांब येथे बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. शेतकरी, तसेच महिला व युवकांना कृषी व वनउपज उत्पादनासाठी पूरक रोजगार  मोठी संधी उपलब्ध होणार आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोयना धरणातील गाळ काढण्यात येणार आहे.

टसर (वन्य) रेशीम शाश्वत रोजगार व संवर्धन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सह्याद्री पर्वतरांगातील शेतकऱ्यांसाठी टसर रेशीम शेती वरदान ठरेल -मुख्यमंत्री

टसर (वन्य) रेशीम शाश्वत रोजगार व संवर्धन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जंगल भागातील शेतकरी महिला व युवकांना टसर रेशीम शेती नाविन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे. ऐन झाडाची लागवड रोजगार हमी योजनेतून करता येते. कुठेही नांगरण करायचे नाही, पाण्याची आवश्यकता नाही, औषध फवारणी नाही त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगांमधील शेतकऱ्यांसाठी टसर रेशीम शेती एक वरदान ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख,उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *