प्रबोधन वाचनालयात वृक्षारोपण व महापालिकेचे अभियान
इचलकरंजी ता.१० गेली काही वर्षे राज्यात सातत्याने होणारी दुष्काळी परिस्थिती तसेच अवकाळी पाऊस यामुळे अन्नदाता बळीराजा संकटग्रस्त झाला आहे .निसर्गाचा झालेला ऱ्हास व परिणामी वसुंधरेचा ढळलेला समतोल यामुळे बिघडलेले निसर्गचक्र दुरुस्त करून या वसुंधरेला सुजलाम सुफलाम करणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी जागतिक पर्यावरण दिनी केलेल्या संकल्प पूर्तीसाठी आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री ना.चंद्रकांत (दादा )पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने वाचनालयाचे जेष्ठ वाचक धोंडीराम शिंगारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने ‘ माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाचे महत्त्व अजित माने, रोहित लाखे, जयेश कांबळे, काजल कदम ,मयुरी जमाले यांनी स्पष्ट केले. वसुंधरा वाचवण्यासाठी वृक्षारोपण करण्याबरोबरच सौर ऊर्जेचा वापर करा, एलईडी दिव्यांचा वापर करा ,विजेचा अपव्यय टाळा असेही आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी प्रसाद कुलकर्णी , सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, भीमराव नाईकवडी,अंकुश भोसले, प्रदीप शेटे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.