साने गुरुजींचा भारतीय संस्कृती संदर्भातील विचार हा सर्वकालिक मार्गदर्शक ठरतो -ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे

साने गुरुजींचा भारतीय संस्कृती संदर्भातील विचार हा सर्वकालिक मार्गदर्शक ठरतो -ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे

इचलकरंजी ता.१३ संस्कृती ही गतकाळाचे संचित असते. सभ्यता हे तिचे वर्तमान रूप असते. संस्कृती विकसित होणे म्हणजेच ती सभ्यतेत रुपांतरीत होणे असते.आज काळ विपरीत आहे म्हणून सभ्यतेची उजळणी करणे गरजेचे आहे. शिक्षणातून योग्य प्रकारचा संस्कार न झाल्याने भारतीय संस्कृतीची योग्यप्रकारे रुजवण झाली नाही. भारतीय संस्कृती संपूर्ण भारताचा तिच्या वैविध्यासह व्यापक विचार करते. कर्मकांडापेक्षा कर्मपूजेला ती महत्त्वाचे मानते. भारतीय समाजाची शोकांतिका विभाजनात आहे म्हणूनच साने गुरुजी भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून आंतरभारतीचा महत्त्वपूर्ण विचार मांडतात. हृदय आणि बुद्धीच्या समन्वयाची ते मांडणी करतात. साने गुरुजींचा भारतीय संस्कृती संदर्भातील विचार हा सर्वकालिक मार्गदर्शक ठरतो असे मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. ते साने गुरुजींच्या १२५ व्या जन्मवर्षानिमित्त साने गुरुजी समविचारी मंच आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ‘ ‘भारतीय संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते.अनिल होगाडे यांनी स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा जयकुमार कोले यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रियाज जमादार यांना आदरांजली वाहण्यात आली.

प्राचार्य डॉ.सुनील कुमार लवटे म्हणाले, भारतीय संस्कृती संग्राहक आहे. ती सांतातून अनंताकडे ,अंधारातून प्रकाशाकडे, भेदातून अभेदाकडे , विरोधातून विकासाकडे , विकारातून विवेकाकडे , गोंधळातून व्यवस्थेकडे आणि आरडाओरडीतून संगीताकडे जाते असे साने गुरुजी म्हणत. कर्म,भक्ती, ज्ञान त्याग ही भारतीची महत्त्वाची अंगे आहेत. भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून साम्यवाद, समाजवाद , सेवादल, सर्वोदय या सर्वांचीच साने गुरुजी चर्चा करतात. माझ्यात सर्वच विचारधारांचा समन्वय झाला आहे असे सांगत साने गुरुजी भारतीय संस्कृतीतील व्यापक तत्त्वाची सुबोध मांडणी करतात. मानवी जीवनासह मानवेतर सृष्टीशी आपण कसे वागतो यावर संस्कृती अवलंबून असते.भारतीय संस्कृतीतील गंगा जमुना सभ्यतेची संस्कृती महत्त्वाची आहे हे साने गुरुजींचे प्रतिपादन महत्त्वाचे आहे. प्राचार्य लवटे यांनी आपल्या दीड तासाच्या अभ्यासपूर्ण भाषणात साने गुरुजींची भारतीय संस्कृती संदर्भातील विचारधारा ओघवत्या भाषेत समजावून सांगितली. समाजवादी प्रबोधिनी मध्ये झालेल्या या कार्यक्रमास साने गुरुजींची विचारधारा जोपासणाऱ्या विविध संस्था ,संघटना ,कार्यकर्त्यांसह अनेक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुषमा साळुंखे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *