नानासाहेब गोरे : बुद्धीनिष्ठा आणि रसिकता यांचा अनोखा संगम

नानासाहेब गोरे : बुद्धीनिष्ठा आणि रसिकता यांचा अनोखा संगम

नानासाहेब गोरे : बुद्धीनिष्ठा आणि रसिकता यांचा अनोखा संगम

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी
ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर
पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)

prasad.kulkarni65@gmail.com

१५ जून हा ज्येष्ठ समाजवादी नेते कालवश ना.ग.तथा नानासाहेब गोरे यांचा जन्मदिन.महाराष्ट्राच्या गेल्या साठ वर्षाच्या राजकारणात जी थोडी नावे आदराने घेतली जातात त्यात नानासाहेब गोरे यांचे नाव घ्यावे लागेल. समाजवादी विचारांची कास धरून त्यादृष्टीने व्यक्तिगत व सामाजिक जीवनात वावरताना त्यांच्यातील प्रसन्नता आणि रुबाबदारी कधी कमी झाली नाही. कारागृहाच्या भिंती ,सीतेचे पोहे ,डाली, गुलबशी, समाजवादाचा ओनामा,शंख आणि शिंपले, काही पाने काही फुले, चिनारच्या छायेत, समाजवादच का ? तापू लागलेला हिमालय यासारखी, सीतेचे पोहे ,आव्हान आणि आवाहन, ऐरणीवरील प्रश्न, बेडूकवाडी, चिमुताई घर बांधतात, विश्व कुटुंबवाद,अमेरिकन संघराज्याचे इतिहास अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली . महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून ही नानासाहेबांनी काम केले.त्यांनी अनेक लेख लिहिले .अनेक व्याख्याने दिली. नानासाहेब हे सर्वार्थाने चिंतनशील कलासक्त व्यक्तिमत्व होते. सखोल चिंतनाच्या आधारे आलेले मानवतावादी सुस्पष्ट विचार त्यांच्या लेखनात व भाषणात दिसून येतात.

१५ जून १९०७ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील हिंदळे या गावी एका सधन कुटुंबात नानासाहेबांचा जन्म झाला. आणि १ मे १९९३ रोजी ते कालवश झाले. प्राथमिक शिक्षण घेतल्यावर ते पुण्यात आले. त्यांनी बीए.एलएलबी या पदव्या घेतल्या.लोकमान्य टिळकांच्या राजकारणाने त्यांचे राजकीय शिक्षण केले. पण त्यांना सामाजिक व राजकीय प्रश्नांची खरी जाण झाली ती सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांच्या सुधारणावादी विचाराने. बुद्धीप्रामाण्यावरील निष्ठा हा आगरकरांचा गुण त्यांना भावला. तो गुण अखेरपर्यंत नानासाहेबांनी आभूषणासारखा मिरवला. १९३० पासूनच भारतीय स्वातंत्र्य आंदोलन, हैदराबाद मुक्ती लढा ,गांधींचे सत्याग्रह आंदोलन यामध्ये नानासाहेब सक्रिय होते. १९३६ ते ३९ या काळात ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकीही नानासाहेब एक होते .१९४८ ते ५३ मध्ये ते समाजवादी पक्षाचे सहचिटणीस होते. १९५७ ते ६२ या काळात संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे ते प्रजा समाजवादी पक्षाचे सरचिटणीस व खासदार होते.१९६४ मध्ये या पक्षाचे अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर बनले. पुढे १९७० साली ते राज्यसभेवर निवडून गेले.१९७७ -७९ साली इंग्लंडमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम केलं. साधना साप्ताहिक, जनवाणी, रचना, जनता आदी नियतकालिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले.तसेच अनेक लढ्यांचे, चळवळींचे नेतृत्व त्यांनी केले.

विद्यार्थी दशेत ते पर्वतीवरील मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभागी झाले होते. त्यात त्यांना कारावासही भोगावा लागला. भूमिगत चळवळीतही त्यांनी काम केले. पंडित नेहरूंच्या रसिक आणि संस्कृत राजकारणाचा प्रभाव नानासाहेबांवर पडला .पंडितजींना समाजवादाचे असलेले आकर्षण व पटलेले महत्त्व हाही त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा होता. या प्रेमातूनच त्यांनी नेहरूंच्या ‘ डिस्कवरी ऑफ इंडिया ‘ या जगप्रसिद्ध ग्रंथाचे ‘ भारताचा शोध ‘ असे नितांत सुंदर मराठी भाषांतर केले.टिळक, आगरकर, महात्मा गांधी ,नेहरू या सर्वांचा काहींना काही प्रभाव नानासाहेबांवर राहिलेला असला तरी त्या सर्वांच्या विचारांची बुद्धीप्रामाण्य चिकित्साही त्यांनी केलेली दिसते.त्यामुळे नानासाहेब विभक्ती पूजेत अडकले नाहीत .विचारांची प्रगल्भता वाढवण्यावरच त्यांचा भर होता. तत्त्वज्ञानापासून ते बालसाहित्यापर्यंत सर्वत्र ही वैचारिक प्रगल्भता दिसून येते.

सहा-सात दशके राजकीय, सामाजिक चळवळीत संघर्षाचे काम करूनही नानासाहेबांच्यातील अभिजात रसिकता कायम होती. ते उत्तम नखचित्र काढत, पियानोही वाजवत असत. साहित्या पासून संगीतापर्यंत सर्वत्र जे जे अभिजात असेल त्याचा शोध नानासाहेबांनी घेतला.ही सारी रसिकता जोपासतानाही त्यांच्यातील राजकारणी सतत जागृत होता. एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे,’ सौंदर्याचा मी खराखुरा उपासक आहे. पण केवळ शाब्दिक सौंदर्य पुरेसे नाही. असुंदराचा मला तिटकारा आहे. शोषण,विषमता या रूपाने ते असुंदर आसपास वावरताना मला दिसते. शाब्दिक सौंदर्यपासनेने ते नाहीसे होत नाही. त्यासाठीच राजकारणाची गरज आहे. मी सौंदर्याचा पूजक असल्याने लोकशाही समाजवादाचा पाईक आहे .आणि त्यामुळेच राजकारणातील आहे .’नानासाहेबांनी आपल्या सुस्पष्ट विचारसरणीशी तडजोड केली नाही. टीकेची, निंदेची पर्वा न करता ते आपले विचार मांडत राहिले.समाजाचे प्रबोधन आणि त्यातून परिवर्तन झाले पाहिजे ही त्यांची जीवननिष्ठा होती. त्यात विचारांपेक्षा कृतीला त्यांनी दिलेले मोठेपण हेच त्यांचे वेगळेपण होते. नानासाहेब गोरे म्हणजे बुद्धीनिष्ठा आणि रसिकता यांचा अनोखा संगम होता. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *