
इचलकरंजी ता.७ एकेकाळी राज्यातील ‘अ ‘वर्गाची श्रीमंत नगरपालिका असलेल्या इचलकरंजी नगरपालिकेचे दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत रूपांतर झाले. महानगरपालिका झाल्यानंतर केंद्र व राज्य शासनाचा मोठा निधी उपलब्ध होईल आणि त्यातून शहराच्या सर्वांगीण कायापालट होईल तसेच नागरिकांना दर्जेदार व मूलभूत सुविधा मिळतील असे सांगितले गेले.मात्र शहराची सध्याची अवस्था पाहता कोणताही इष्ट स्वरूपाचा बदल झालेला दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने शहराच्या मूलभूत प्रश्नाबाबत सभागृहात लोकबळाचा धाकही निर्माण होऊ शकत नाही.त्यामुळे महापालिका तयार होताना दिलेल्या आश्वासनांचे आणि ठेवलेल्या उद्दिष्टांचे काय झाले ? हा प्रश्न उभा राहतो. म्हणून महापालिकेच्या रूपात असलेले आपले स्थानिक स्वराज्य नगर व लोकविकासाचे व्हावे यासाठी नागरिकांनी सजग होऊन लोकशक्तीचा धाक उभा करण्याची गरज आहे असे मत प्रबोधन वाचनालयाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रामध्ये ‘इचलकरंजी महापालिकेची दोन वर्षे ‘ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. रमेश लवटे होते. स्वागत व प्रास्ताविक पांडूरंग पिसे यांनी केले.
शशांक बावचकर पुढे म्हणाले , कोणतीही पूर्व तयारी न करता आणि कोणतीही हद्द वाढ न करता महापालिका निर्माण करण्यात आली.आज इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे.कचऱ्याचा उठाव योग्य पद्धतीने होत नसल्याने कचऱ्याचे ढीग जागोजागी वाढत आहेत. शहरांतर्गत रस्त्यांचीही दुरावस्था आहे.महापालिकेच्या असलेल्या शाळांची स्थिती दोन-चार शाळांचा अपवाद वगळता खालावत चाललेली आहे. महापालिकेसाठी आकृतीबंधातून मंजूर झालेल्या जागांची नवीन नोकर भरती झालेली नाही. महापालिकेकडे सेवक पगार ,निवृत्ती वेतन यापुरतेच शासन सहाय्यक अनुदान येते. मात्र अन्य कोणता विकास निधी न आल्याने विकास कामे होत नाहीत. पालिकेची आर्थिक स्थिती गंभीर बनलेली आहे. त्यामुळे पाणी योजना, ड्रेनेज योजना यासाठी लागणाऱ्या पावणे दोनशे कोटी रुपयांचा हिस्सा महापालिका कसा उभा करणार हा प्रश्न आहे. वस्तू आणि सेवा कराचे साडेतीनशे कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडून मिळतील असे महापालिकेला वाटत होते.पण तो निधी मिळणार नाही असे शासनाकडून स्पष्ट झाले आहे .या सर्व पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्याचा निर्णय घाईचा ठरला आहे. शशांक बावचकर यांनी आपल्या मांडणीमध्ये गणराज्यपद्धती, ईस्ट इंडिया कंपनी काळ, नगरपालिका निर्मिती, कररचना, सार्वजनिक कामे, वैकल्पिक,क्रीडा, सांसृतिक कामे, उत्पनाची साधने व खर्चाचा मेळ , विकासाचा आराखडा , निविदा , अतिक्रमणे इत्यादी या विषयाच्या विविध बाबींचे विस्तृत विवेचन केले.यावेळी प्रसाद कुलकर्णी, अन्वर पटेल, दयानंद लिपारे, सचिन पाटोळे, शकील मुल्ला, नौशाद शेडबाळे, रामभाऊ ठीकणे, नारायण लोटके, मनोहर जोशी ,प्रमोद नेजे आदी उपस्थित होते.प्रा.रमेश लवटे यांनी अध्यक्षीय समारोप केला.